आत्मज्ञानाचे महत्त्व
(अध्याय चौथा )
आत्मज्ञानाची महती सांगितल्यावर ते कसे प्राप्त होते हे समजण्यासाठी भगवंतांनी सध्या आपण पहात असलेला पुढील श्लोक सांगितला
श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध । ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग ।। 39 ।।
ह्या श्लोकानुसार श्रद्धावान, इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनेत तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते. आत्मज्ञान मिळवण्यासाठी माणसाची सद्गुरुंच्या वचनावर नितांत श्रद्धा असणे आवश्यक आहे. सद्गुरुंच्या कृपेने श्रद्धावान, इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनेत तत्पर असलेल्या पुरुषाचे अज्ञान नाहीसे झाल्याने आत्मज्ञान प्रकट होते. त्यामुळे त्याला भगवत प्राप्ती होऊन परमशांती लाभते. परमात्म्याचा अंत नसलेला मंगलरूप आनंद हृदयात स्फुरू लागतो. एकदा का आत्मसुखाची अमृतमधुर गोडी निर्माण झाली, की मन ज्ञानेंद्रिये सुचवत असलेल्या विषयांच्या आकर्षणाला विटून जाते. त्यामुळे इंद्रिये निष्प्रभ होतात. आत्मज्ञानी मनुष्य आत्मस्वरूपाचे भान ठेऊन असल्याने स्वत:ला कर्ता समजत नाही. आत्मज्ञान हृदयात स्थिर झाले की, जिकडे पाहावे तिकडे परमशांतीच दिसू लागते, आप-पर भाव संपून जातो. हा शांतीचा प्रवाह एव्हढा मोठा असतो की, ज्याप्रमाणे समुद्राच्यापलीकडे काय आहे हे जसे दिसू शकत नाही. त्याप्रमाणे काहीकेल्या शांतीच्या पैलतीराचा ठाव लागू शकत नाही. असा हा उत्तरोत्तर वाढत राहणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे. त्याचे वर्णन करू लागलो, तर तो अपार आहे.
अशा पद्धतीने आत्मज्ञानाचे महत्त्व भगवंतानी सांगितले. ह्यावरून हे लक्षात येते की, जीवनात इतर गोष्टी मिळवण्याचा माणसाने प्रयत्न करावा पण आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास प्राधान्य द्यावे कारण स्वत:चा उद्धार करून घेण्याच्या दृष्टीने आत्मज्ञान प्राप्त करून घेणे हेच मानवी जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जो जीवनात आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास टाळाटाळ करतो किंवा आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्यावर आपला उद्धार होईल ह्या श्रीहरिच्या सांगण्यावर ज्याची श्रद्धा नसते असा संशयी मनुष्य नाश पावतो असं भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात त्याला इहलोक साधत नाही आणि परलोकही मिळत नाही, तसेच, त्याला आत्मसुखाची प्राप्तीही होत नाही.
नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा । न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ।। 40।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, हे बघ, ज्याला अध्यात्माची आवड नाही, त्याच्या जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे? त्यापेक्षा मरण बरे. एखादे सामसूम घर किंवा प्राणावाचून जसे शरीर, त्याप्रमाणे आत्मज्ञान नसलेला मनुष्य असतो. मी म्हणजे हे शरीर आणि समोरची दुनिया खरी आहे ह्या भ्रमात तो वावरत असल्यामुळे त्याचे जीवन दिशाहीन होते. आत्मज्ञानाची मनात इच्छा निर्माण झाली, तर ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते.
येथे स्पष्ट शब्दात माउली आपल्याला सांगत आहेत की, जर तुम्हाला अध्यात्माची आवड नसेल तर निर्माण करा. अध्यात्माची आवड नाही हा तुमचा दोष नाही कारण माणसाला मिळालेला स्वभाव हा पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेला असतो आणि तो करत असलेली कर्मेही त्याच्या वाट्याला पूर्वकर्मानुसार आलेली असतात. ही वाट्याला आलेली कर्मे जो निरपेक्षतेने करून ईश्वराला अर्पण करत राहील त्याला शांतीरूप आत्मसुखाची चव चाखायला मिळून ते आणखीन आणखीन मिळावे ह्यादृष्टीने त्याच्यात अध्यात्माची आवड आपोआपच निर्माण होईल. जो असा प्रयत्न करणार नाही तो जगला काय आणि मेला काय सारखेच कारण त्याचा हा जन्म वाया गेल्यात जमा आहे.
क्रमश: