महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसग्रुप अन् तावडेंचे महत्त्व वाढले!

06:44 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीत  महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुतीवर वरचढ ठरणार हे दिसत होतेच. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फोडल्याची जनतेतून नाराजी, त्यात शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष याचा जबर फटका महायुतीला बसला. मोदींची हॅटट्रीक, धार्मिक ध्रुवीकरण, राम मंदिर हे मुद्दे प्रभावहीन ठरले. मोदींच्या खूप सभा होऊनही फरक पडला नाही. ठाकरेंनी मुंबई राखली, पवारांनी बारामतीसह आपला सक्सेस रेट सर्वोच्च ठेवला. काँग्रेस ग्रुपने यशस्वी कामगिरी केली. त्याउलट अजित पवार पुरते अपयशी ठरले. मुख्यमंत्र्यांनी कशीतरी आपली बूज राखली. विदर्भ फडणवीस यांच्या हातून गेले. परिणामी भाजपच्या देशातील कामगिरीवर परिणाम झाला.

Advertisement

2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून महाराष्ट्रातील जनतेने भरभरून मते दिली होती. मात्र त्यात प्रभावी घटक असलेल्या मराठा, धनगरसह ओबीसी आणि दलित या घटकांना विविध कारणांनी भाजपने नाराज केले. त्याचे पडसाद मतातून उमटले. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षात असलेली एकवाक्यता आणि महायुतीतील नेत्यांची एकमेकाला अडचणीत आणणारी खेळी दुसरीकडे याचा परिणामही या निवडणुकीत दिसून आला आहे. शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या पक्षात पाडलेली फूट महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडलेली नाही याची स्पष्ट चिन्हे महाराष्ट्रात दिसत होती. मात्र नरेंद्र मोदी नावाचा झंझावात, त्यांचा चारशे पारचा नारा, राम मंदिरची उभारणी झालेली असल्याने आणि हे आंदोलन महाराष्ट्रातूनच प्रदीर्घकाळ चालवले गेलेले असल्याने त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या निकालावर पडेल अशी चिन्हे होती. मात्र येथे राष्ट्रीय मुद्यांना आणि मोदी यांनी पुढे केलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रचाराला धुळे, जळगाव, औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर आणि बीड वगळता कुठेही यश आले नाही. मराठा, ओबीसी वादाचा फायदा पंकजा मुंडे यांना बीडमध्ये झाला तर रावसाहेब दानवेंना जालन्यात फटका बसला. अॅङ उज्ज्वल निकम यांना वर्षा गायकवाड यांनी अटीतटीच्या लढाईत दिलेली मात ध्रुवीकरणाच्या मुद्यावर मात करून गेली. मुंबईतील तीन चार मतदार संघ शिवसेनेने राखले. अरविंद सावंत यांनी बंडखोर सेना आमदार आ. यामीनी जाधव, अनिल देसाई यांनी खा. राहूल शेवाळे आणि अमोल किर्तीकर यांनी आ. रविंद्र वायकर यांचा केलेला पराभव ठाकरे विरोधातील सर्वांनाच धक्का देऊन गेला. मिहीर कोटेचा यांना संजय दीना पाटील यांनी दिलेली मात हा मुंबई भाजपसाठी उज्ज्वल निकम यांच्यापेक्षाही मोठा धक्का होता.

Advertisement

अजितदादा हिरो ते झिरो

शरद पवार यांना घरात बसा असा सल्ला देऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपद पटकावलेले अजितदादा हिरोपासून झिरो झालेले महाराष्ट्राने अवघ्या अकरा महिन्यात पाहिले. बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना दिलेली भरभरून मते शरद पवारांचे महत्त्व पटवणारी तर होतीच पण, धाराशिवमधील अर्चना पाटील यांचा पराभवसुध्दा मोठा धक्का आहे. सुनील तटकरे या दादांच्या मित्राने त्यांच्या पक्षाची बूज राखली. नाहीतर अमोल कोल्हेंपासून निलेश लंकेंपर्यंत सर्वांना दमात घेणाऱ्या दादांना कोठेही आपला प्रभाव दाखवता आला नाही. शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचे राष्ट्रीय महत्त्व या निवडणुकीत वाढलेले दिसलेच. भाजपने तात्काळ विनोद तावडे यांच्या भेटीला मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवून बिहारच्या आघाडीवर कार्यरत होण्यासाठीचा संदेश दिला. महाराष्ट्र अशाप्रकारे दोन्ही आघाड्यांकडून सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणार हे स्पष्ट झाले. त्यात मोदींचे नाव काढायला संजय राऊत धाऊन आले आणि त्यांनी मोदींच्या राजीनाम्याची सर्वप्रथम मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी खूपच मनावर घेतल्यामुळे ठाणे, कल्याण, संभाजीनगर आणि हातकणंगले हे चार मतदारसंघ वाचले. नाहीतर या सर्वठिकाणी त्यांच्याविरोधातील रणनीती ही उध्दव ठाकरे यांच्यापेक्षाही त्यांच्या मित्रांकडूनच मोठे धक्के देण्याची तयारी झाली होती. त्यामुळे ठाकरेंना जे नाशिक व विदर्भात साधले ते ठाणे, कोकणात साधता आले नाही. मात्र यामुळे अजितदादा आणि शिंदेंच्या गडाला गळती लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अडीच वर्षात परिस्थिती भाजपच्या हातून निसटत चालली होती आणि पक्षामागून पक्ष फोडूनही आपल्याला अपेक्षित असणारा मत टक्का जमा होत नाही हे त्यांच्या लक्षात येत होते. निवडणुकीचा शेवटचा टप्पा येईपर्यंत भाजप राज्यात मित्रपक्ष जोडत होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी राज ठाकरे यांच्याशीही हातमिळवणी केली. मात्र त्यांना अपेक्षित यश तरीही मिळाले नाही. हे महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांचे वैशिष्ट्या म्हणावे लागेल. राज्यात विदर्भात भाजपचा वरचष्मा राहील असे सुरूवातीचे वातावरण होते. मात्र नितीन गडकरी यांच्या उमेदवारीच्या घोषणेला जसजसा विरोध होत गेला तसतसे तिथले वातावरण बदलत गेले. सुधीर मुनगंटीवर यांची इच्छा नसताना चंद्रपूरमधून त्यांना उतरवण्यात आले. बाळू धानोरकर यांच्या पत्नी आ. प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या मतांनी त्यांचा पराभव केला हा मोठा धक्का होताच. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आपापले जिल्हे सांभाळल्याने त्यांना यंदा चांगले यश मिळाले. सतेज पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड यांच्या बरोबरच यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमित देशमुख आपापल्या विभागात चमकले. विशेष म्हणजे नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची भूमिका काँग्रेस सावरण्यास उपयुक्त ठरली. त्यामुळे सांगली आणि नंदूरबार हे जुने बालेकिल्ले दहा वर्षांनी खेचून आणण्यात काँग्रेस यशस्वी झाली.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article