मराठीचे महत्त्व हे पूर्वीप्रमाणेच अबाधित
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : सांखळी येथे सृजन संगम कार्यक्रम
साखळी : गोव्यात आज परप्रांतीयांचे स्थलांतर भरपूर सुरू आहे. परप्रांतीयांची वाढणारी संख्या पाहता त्यामुळे गोवेकर हरवत चालला आहे, अशी भीती वाटत आहे. त्यावर उपाय म्हणून गोव्यातील रोजगार हे मूळ गोवेकरांना व कोकणी शिकणाऱ्यांना मिळावेत, यासाठी या राज्याची बोलीभाषा असलेली कोकणी ही बोलता, लिहिता व वाचता यावी या तत्त्वावर ती नोकर भरतीत सक्तीची करण्यात आले आहे. परंतु मराठीचे महत्त्व हे सर्व क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच अबाधित ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे सृजन संगम या कार्यक्रमात बोलताना केले.
गोवा मराठी अकादमी व रवींद्र भवन सांखळी यांच्या संयुक्त विद्यमाने सांखळी रवींद्र भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोव्यात स्थायिक असलेले मराठी भाषिक, मराठी भाषेची सक्ती असलेल्या अनेक रोजगारांमध्ये थेट जागा मिळवतात. अशावेळी गोवेकर उमेदवार कुठेतरी समाधानकारक मराठीतील गुण नसल्याने मागे पडतो. यावर उपाय म्हणून कोकणी ही रोजगारासाठी सक्तीची करण्यात आली आहे.
गोव्यात कोकणी व मराठी हा कोणताही वाद नाही. कोकणी ही राजभाषा तर मराठी सहराजभाषा असून दोन्हीही भाषांना समान महत्त्व व दर्जा आहे. गोव्यात मराठीतून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास कोणीही अडवू शकत नाही. याही भाषेला तितकेच महत्त्व सर्व क्षेत्रांमध्ये देण्यात देण्यात आलेले आहे. असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. मराठी ही भाषा संस्कारांची आहे, या भाषेत आपल्यावर तसेच युवा पिढीवर संस्कार घडविण्याचे सामर्थ्य आहे. ते वेळोवेळी सिध्द झालेले आहे. त्यासाठीच या भाषेला मोठे महत्त्व आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा मराठी अकादमीचा सृजन संगम हा कार्यक्रम गोव्यातील युवा पिढीच्या सुप्तगुणांना वाव देणारा कार्यक्रम आहे. अनेकदा आपणालाच आपल्यातील सुप्त गुणांची माहिती नसते. परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून असे सुप्त गुण सर्वांसमोर येऊन ते आपल्याला भविष्य घडविण्यासाठी लाभदायक ठरतात, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले.
गोवा सरकारने मराठी भाषेला खूप काही दिलेले आहे. गोव्यात सर्व भाषा एकसमानतेने वावराव्यात. विशेषत: कोकणी व मराठी या दोन्ही भाषा एकत्रितपणे पुढे जाव्यात. भविष्यात मराठी विषयातून शिकणाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही व अडचणी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. भविष्यात एक नवयुग निर्माण व्हावं जेणेकरून मराठीलाही चांगलं स्थान मिळेल व त्यासाठी मराठीचे सर्व प्रेमी आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतील. मराठी ही बाहेरून आलेली भाषा नसून ती आपल्याच पूर्वजांनी गोव्यात राखून ठेवलेली संस्कृती व संस्काराची भाषा आहे, असे यावेळी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी आपल्या भाषणात म्हटले.