प्रो-कुस्ती लीगचा भारतीय मल्लावर प्रभाव
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतामध्ये सध्या सुरु असलेल्या प्रो-कुस्ती लीगने भारतीय कुस्ती क्षेत्रामध्ये चांगलाच प्रभाव निर्माण केला आहे. या लीग स्पर्धेमुळे विविध वयोगटातील मल्लांना आगामी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत आहे.
व्हिएतनाममधील डा नॅग येथे 23 मेपासून सुरु झालेल्या 17 आणि 23 वर्षाखालील वयोगटातील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये अनेक मल्लांना संधी मिळाली आहे. मल्लांसाठी ही प्रो-लीग कुस्ती स्पर्धा त्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ ठरले आहे. भारताच्या नव्या युवा पिढीमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये अनेक दर्जेदार मल्ल पहावयास मिळतील व्हिएतनाममध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय कुस्ती संघात 23 वर्षाखालील पुरुषांच्या फ्री स्टाईल विभागामध्ये पंजाब रॉयल्सच्या चंद्रमोहनची तसेच हरियाणा थंडर्सच्या सचिन मोरची निवड झाली आहे. त्याच प्रमाणे महिलांच्या 23 वर्षाखालील वयोगटामध्ये भारतीय संघात हरियाणा थंडर्सचे मल्ल नेहा आणि काजल यांची निवड झाली आहे. या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय मल्ल निश्चितच दर्जेदार कामगिरी करतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.