सुळेभावी महालक्ष्मीची मूर्ती रंगकामासाठी श्रद्धेने रवाना
येत्या मार्च महिन्यात भरणार यात्रा
बेळगाव : लाखो भाविकांचे आराध्यदैवत असणाऱ्या सुळेभावी येथील महालक्ष्मी देवीची मूर्ती रंगकामासाठी पाठविण्यात आली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. शनिवारी दिवाळी पाडव्यादिवशी भाविकांच्या उपस्थितीत देवीची मूर्ती श्रद्धापूर्वक रंगकामासाठी पाठविण्यात आली. पुढील वर्षी महालक्ष्मी देवीची जत्रा भरणार आहे. या पार्श्वभूमीवर देवीची मूर्ती पालखीत बसवून मिरवणुकीने बडीगेर यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. श्री महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष, सदस्य, पुजारी, हक्कदार आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. देवीचे विशेष पूजन केल्यानंतर मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. देवीची मिरवणूक व धार्मिक विधी सर्वांना पाहता यावेत, यासाठी सुळेभावी येथे ठिकठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. येत्या मार्च 2025 मध्ये देवीची यात्रा भरणार आहे.