‘तरुण भारत’मुळे समाजाची वैचारिक मांडणी
मान्यवरांसह वाचकांनी व्यक्त केल्या भावना : निपाणीत तरुण भारत कार्यालयाचा वर्धापनदिन साजरा : शुभेच्छांचा वर्षाव
निपाणी : भारतीय स्वातंत्र्याचा लढा, सीमालढा,गोवामुक्ती संग्राम या राष्ट्रव्यापी चळवळींसह गेल्या शंभर वर्षातील अनेक सामाजिक चळवळी आणि बदलांचा साक्षीदार तरुण भारत ठरला आहे. सामान्य शक्तींना अन्यायाविरोधात लढण्याचे बळ देण्याचे काम तरुण भारतने कायम केले आहे. याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि क्रीडा विश्वातील घडामोडींचे निष्पक्ष वृत्तांकन करून तरुण भारतने समाजाच्या वैचारिक मांडणीत मोलाची भूमिका बजावली आहे, अशा भावना मान्यवरांसह वाचकांनी व्यक्त केल्या. निपाणीत शुक्रवारी दैनिक तरुण भारत कार्यालयाचा 31 वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा झाला. यावेळी समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक आणि नागरिकांनी दैनिक तरुण भारतवर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रारंभी उपसंपादक विजयकुमार बुरुड आणि ज्योती बुरुड दांपत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा पार पडली.
शेंडूर येथील शक्ती मठाचे अरुणानंद तीर्थ स्वामीजी, नगराध्यक्षा सोनल कोठडीया, हालशुगरचे अध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक अविनाश पाटील, समित सासणे, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती डॉ. जसराज गिरे, बेळगाव येथील संपादकीय विभागातील उपसंपादक अनिल पाटील, जाहिरात विभागाचे कलमेश हन्नूरकर, वितरण विभाग प्रमुख अनिल शेलार यांच्या हस्ते तरुण भारतच्या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, व्हीएसएमचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, व्हा. चेअरमन पप्पू पाटील, युवा नेते रोहन साळवे, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, माजी सभापती बाळासाहेब देसाई-सरकार, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह मान्यवरांनी पुरवणीचे कौतुक केले. यानंतर राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांच्या शुभेच्छांच्या वर्षावात तरुण भारत चिंब झाला. यावेळी अनेकांनी तरुण भारत संदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तरुण भारतने यापुढेही समाजसेवेचे व्रत कायम जोपासावे, अशा शुभेच्छा दिल्या. उपसंपादक भानुदास कोंडेकर, अनिल पाटील यांनी आभार मानले.