जगबुडी पुलाची ओळख कायमची पुसणार !
खेड :
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावरील अखेरची घटका मोजणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलावरील रहदारीला गेल्या ३ वर्षांपासून ब्रेक लागला आहे. धोकादायक पुलामुळे पादचाऱ्यांकडूनही वापर बंद झाला आहे. त्यामुळे जगबुडी पूल पाडण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंत जुना पूल जमीनदोस्त करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याने ब्रिटिशकालीन पुलाची ओळख कायमची पुसली जाणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेतील ब्रिटिशकालीन पूल महत्त्वाचा दुवा ठरला होता. या पुलावर अनेक प्राणांतिक अपघातही घडले आहेत. १९ मार्च २०१३मध्ये महाकाली आरामबसला झालेल्या भीषण अपघातात ३९ जणांना हकनाक प्राणास मुकावे लागले होते. या भीषण अपघातानंतर जुन्या जगबुडी पुलाच्या डागडुजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरवर्षी अतिवृष्टीदरम्यान पुलावरून पाणी वाहू लागताच महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प होत होता. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान सर्वप्रथम भरणे येथे नवा पूल उभारण्यास प्राधान्य देण्यात आले.