‘मेक इन इंडिया’ची कल्पना अयशस्वी
लोकसभेत राहुल गांधी यांचा हल्लाबोल : अभिभाषणावरील चर्चेत युपीएच्या उणीवाही दाखवल्या: बेरोजगारीबाबत खंत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी आभार प्रस्तावावर चर्चा सुरू केली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या संबोधनात सरकारच्या योजनांवर हल्लाबोल केला. ‘मेक इन इंडिया’ ही चांगली कल्पना आहे, पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले’, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच बेरोजगारीच्या मुद्यावर भाष्य करताना त्यांनी मोदी सरकारवर टीका करताना युपीएवरही निशाणा साधला.
31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारपासून लोकसभेत अभिभाषणावरील चर्चा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार किंवा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार बेरोजगारीची समस्या सोडवू शकले नाही, असे वक्तव्य करत राहुल गांधींना सर्वांनाच आश्चर्यचकित केले. देशाचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी जास्तीत जास्त प्रभावशाली प्रयत्न करायला हवेत, असेही ते पुढे म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत बोलताना राहुल गांधींनी बेरोजगारीचा उल्लेख नसल्याबाबत खंत व्यक्त केली. तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर युपीए किंवा एनडीएने दिले नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी मेक इन इंडियाबद्दल जे सांगितले ते एक चांगली कल्पना आहे. पण उत्पादन अयशस्वी होत आहे. आम्ही पंतप्रधानांना दोष देत नाही आहोत, पंतप्रधानांनी प्रयत्न केला, कल्पना चांगली होती पण ते अयशस्वी झाले, अशी फटकार राहुल गांधींनी लगावली.
चीन आपल्यापेक्षा 10 वर्षे पुढे
जेव्हा आम्ही संगणक आणला तेव्हा आमची थट्टा झाली. या देशातील तरुणांनी बदलाचा विचार केला पाहिजे. ड्रोन म्हणजे काय? ते बॅटरीवर चालते आणि त्यात कॅमेरा बसवलेला असतो. त्याचप्रमाणे, इलेक्ट्रिक कारकडे पहा, ही एक इलेक्ट्रिक मोटर असून त्यामध्ये बॅटरी बसवलेली आहे. इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी, ऑप्टिक्स आणि एआय या आजच्या चार मूलभूत गोष्टी आहेत. गुगल, फेसबुक, सर्व कंपन्या डेटावर काम करत आहेत. भारताकडे डेटा नसल्यामुळे आपण त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे सांगत चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा 10 वर्षे पुढे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
पटेल-आंबेडकरांची मूल्ये चिरडल्याचा दावा
लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन निवडणूक आयुक्त आणण्यावरही राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला. ही एक योजनाबद्ध रणनीती होती. निवडणूक आयोगात आम्हाला न्याय मिळणार नाही. भगवान शिव यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, देशाला त्याच्या प्राचीन वारशाशी जोडलेले राहण्याची गरज आहे. तुम्ही सरदार पटेलांचा उल्लेख करता पण त्यांच्या मूल्यांना दररोज चिरडता. तुम्ही भगवान बुद्धांबद्दल बोलता, पण त्यांच्या मूल्यांवर विश्वास ठेवत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
बेरोजगारीच्या मुद्यावर संपुआवरही निशाणा
आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी स्वत:च्या सरकारच्या कमतरताही सांगितल्या. ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारही त्यांच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत देशातील बेरोजगारीची समस्या सोडवू शकले नाही. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारही गेल्या 10 वर्षात याबद्दल काहीही करू शकले नाही, असेही सांगितले.
महाराष्ट्रातील वाढीव मतदारांचा मुद्दाही उपस्थित
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीनंतर, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात 70 लाख नवे मतदार अचानक तयार झाल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर फक्त पाचच महिन्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नावे जोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, भाजपने जिंकलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये नवीन मतदारांची संख्या जास्त असल्याचेही ते म्हणाले. गेल्यावर्षी झालेल्या या निवडणुकीदरम्यान मतदारयाद्यांमध्ये विसंगती आढळल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच याप्रकरणी निवडणूक आयोगाने इलेक्टोरल रोलवरील डेटा विरोधकांच्या महाविकास आघाडीला विश्लेषणासाठी द्यावा अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली.
अभिभाषणावर आज पंतप्रधानांचे उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतील, असे संसदीय कामकाज समितीकडून सांगण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर काही पक्षाच्या सदस्यांनी मतप्रदर्शन केले आहे. ही चर्चा मंगळवारीही सुरू राहणार असून दिवसभरातील अंतिम सत्रात पंतप्रधान लोकसभेमध्ये विरोधकांनी केलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करतील.