‘आयसी 814’ सीरिजचा वाद चिघळला
केंद्र सरकारने घेतली दखल : नेटफ्लिक्स पदाधिकाऱ्याला समन्स
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विजय वर्माची मुख्य भूमिका असलेली आणि अनुभव सिन्हा यांचे दिग्दर्शन लाभलेली सीरिज ‘आयसी 814 : द कंधार हायजॅक’वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या सीरिजमध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावे देण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या सीरिजवर बहिष्कार टाकण्याची मागणी एकीकडे होत असताना सरकार देखील याप्रकरणी अॅक्शनमोडमध्ये आले आहे.
प्रत्यक्षात विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे इब्राहिम अतहर, शाहिद अख्तर सईद, गुलशन इक्बाल, सनी अहमद काजी, मिस्त्राr जहूर इब्राहिम आणि शाकिर अशी होती.
तर सीरिजमध्ये या दहशतवाद्यांची नावे भोला, शंकर, डॉक्टर, बर्गर आणि चीफ असल्याचे दर्शविण्यात आले होते. सोशल मीडियावर लोकांनी भोला आणि शंकर या नावांवरून आक्षेप घेतला आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हाने जाणूनबुजून हिंदू नावांचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे.
आता या वादाप्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्स कंटेंट हेडला मंगळवारी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ‘आयसी-814’चे अपहरणकर्ते हे क्रूर दहशतवादी होती, त्यांनी स्वत:ची धार्मिक ओळख लपविण्यासाठी सांकेतिक नावांचा वापर केला होता. तर दिग्दर्शक अनुभव सिन्हाने त्यांना हिंदू नावे देत स्वत:च्या गुन्हेगारी उद्देशाला वैध स्वरुप दिल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी केला आहे.
नेपाळच्या काठमांडू येथून दिल्लीच्या दिशेने झेपावलेल्या विमानाचे उ•ाणाच्या काही मिनिटातच अपहरण करण्यात आले होते. या विमानात चलाक दलासोबत एकूण 180 लोक सवार होते. विमानाचे अपहरण करण्यात आल्यावर प्रथम अमृतसर, मग लाहौरमार्गे दुबई आणि मग कंधार येथे ते नेण्यात आले होते.
पुस्तकावर आधारित सीरिज
ही वेबसीरिज पत्रकार श्रीजॉय चौधरी यांनी लिहिलेले ‘आयसी 814 : द कंधार हायजॅक’ हे पुस्तक तसेच विमानाचे वैमानिक कॅप्टन देवी शरण यांनी लिहिलेले पुस्तक ‘फ्लाट इनटु फियर : द कॅप्टन स्टोरी’वर आधारित आहे. या सीरिजमध्ये विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि अरविंद स्वामीसोबत मनोज पाहवा, अनुपम त्रिपाठी, दीया मिर्झा, पत्रलेखा, अमृता पुरी, दिव्येंदु भट्टाचार्य आणि कुमुद मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.