रत्नागिरीच्या समुद्रात मलपी मच्छिमार बोटींचा धुडगूस
फिशरिज विभागाची कारवाई
रत्नागिरी :
मलपी कर्नाटक येथील मासेमारी नौकांनी रत्नागिरी नजीकच्या पावस - गोळपच्या किनारी समुद्रात बुधवारी रात्री अतिक्रमण केल्याची बाब मच्छीमारांकडून मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्ती नौका त्या ठिकाणी दाखल झाली. रात्री ११:३० च्या दरम्यान मलपी येथील ३५-४० हायस्पीड ट्रॉलर नौका बेकायदेशीर मासेमारी करीत असल्याचे निदर्शनास आले. त्या नौकांचा पाठलाग करत त्यातील एक मलपी नौका "अधिरा" IND-KL-02-MM5724 या नौकेला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यावेळी इतर नौकांनी रत्नागिरी फिशरिजची गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच पकडलेल्या नौक्यावरील खलाशांनी गस्तीनौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इतर नौकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहून नौकेवरील कर्मचाऱ्यांनी ही बाब सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांना कळवली. त्यामुळे या विभागाकडून आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या लोकांना संदेश देऊन गस्ती नौकेला मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली. ही बाब स्थानिक मच्छीमार यांच्या निदर्शनास येताच आठ ते दहा मासेमारी नौकांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. याच दरम्यान रत्नागिरी पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलीस बळ मिरकरवाडा येथील नौके वरून पाठवण्यात आले. मात्र स्थानिक नौकांची मदत, अतिरिक्त पोलिसांची कुमक या सर्व बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या. नौकेवर म.सा. मा. नि. अ. १९८१ अंतर्गत दावा दाखल करण्याची कारवाई आज गुरुवारी करण्यात येणार आहे.