For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिकारीचा बेत अंगलट, 16 जणांना पकडले

12:24 PM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिकारीचा बेत अंगलट  16 जणांना पकडले
Advertisement

नेत्रावळी अभयारण्यातील प्रकार : पाच काडतुसे, इतर साहित्य जप्त,संशयित कदंब महामंडळाचे कर्मचारी

Advertisement

सांगे : नेत्रावळी अभयारण्यातील साळजिणी येथे शिकार करून पार्टी करण्यासाठी गेलेल्या सोळा जणांना वन खात्याने पाच काडतुसांसह पकडले असून पकडलेले संशयित हे कदंब महामंडळाचे कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वन खात्याने या भागात केलेली आजपर्यंतची ही मोठी कामगिरी आहे. कदंब महामंडळाचे सांगे भागातील कर्मचारी विशेषत: वाहनचालक, वाहक हे पार्टी करण्यासाठी नेत्रावळी अभयारण्यातील साळजिणी येथे शनिवारी रात्री 9.30 च्या दरम्यान टप्याटप्यांने जात होते. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना सशय आला. वन खात्याचे कर्मचारी गस्तीवर गेले असता त्यांनी या सोळा जणांना शिकारीला गेल्यावेळी पकडले. आणखी दोघे पळून गेलेले असण्याची शक्यताही वन खाते पडताळून पाहत आहे. गावकऱ्यांकडूनही माहिती गोळा केली जात आहे. सदर संशयितांकडील बंदूक अजून वन खात्याला सापडलेली नाही. मात्र पाच काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत. याशिवाय कोयता, कुऱ्हाड, भांडी, ताटे इत्यादी साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

जंगली जनावराची शिकार करून पार्टी करण्याचा त्यांचा बेत होता. पकडल्यानंतर त्यांना रात्री उशिरा नेत्रावळी वन्यजीव विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. वन खात्याकडून वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 27, 30 आणि 31 खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अभयारण्यात बेकायदा प्रवेश, बेकायदा शिकार करणे, काडतुसांसारखे धोकादायक साहित्य नेणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना रविवारी उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्याकडे रानटी जनावराचे मांस मिळालेले नाही, अशी माहिती प्राप्त झाली. अभयारण्यात रानटी जनावराची शिकार करण्यास तसेच बंदूक, काडतूस घेऊन फिरण्यास बंदी आहे. वन्यजीव विभागाचे साहाय्यक वनपाल दामोदर सालेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रावळी अभयारण्याचे आरएफओ देविदास वेळीप पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.