शिकाऱ्याचीच शिकार !
भारत हे फिरकी गोलंदाजीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं...त्यामुळं आपल्यासारखे ‘स्पिन’चा सामना करण्यात माहीर फलंदाज सापडणं कठीण असा एक गोड समज पसरलाय. मात्र तो किती चुकीचा आहे हे नुकतंच पुन्हा एकदा दाखवून दिलंय ते न्यूझीलंडच्या सँटनरनं. परंतु फिरकीपटूंसमोर मायभूमीत आपली दाणादाण उडण्याची ही काही पहिलीच खेप नाहीये...
एकेरी-दुहेरी धावा काढण्याचं अप्रतिम कौशल्य, ‘शार्प’ क्षेत्ररक्षण, कर्णधाराचे लवचिक डावपेच अन् प्रभावी मारा यांच्या जोरावर कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता असलेल्या न्यूझीलंडनं यजमान भारताला पहिल्या दोन्ही कसोटींत पराभूत केलं आणि भारतात पहिल्यावहिल्या मालिका विजयाची नोंद करताना सिद्ध केलं की, फक्त आक्रमक खेळाच्या जोरावर सामने जिंकणं शक्य नाहीये...तब्बल 12 वर्षांनंतर अन् 18 कसोटी मालिकांत विजयी घोडदौड कायम ठेवल्यानंतर भारतीय संघाला आपल्याच भूमीवर पहिल्यांदाच गारद व्हावं लागलं...मोठ्या आत्मविश्वासानं सावजावर नेम धरून बसलेल्या शिकाऱ्याचीच शिकार झाली !...
या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज अन् सध्या समालोचकाची भूमिका बजावणाऱ्या सायमन डूल बोललाय ते खरंच असं म्हणावं लागेल. तो म्हणतो, ‘भारतीयांना फिरकी गोलंदाजी खेळणारे सर्वोत्तम फलंदाज म्हणणं साफ चुकीचं. तथापि, प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणणारे उच्च दर्जाचे फिरकी गोलंदाज मात्र भारतातर्फे खेळलेत’...त्यानं मान्य केलंय की, न्यूझीलंडच्या संघात जागतिक दर्जाचे फिरकीपटू नाहीत, तरी देखील यजमानांच्या फलंदाजांचं तंत्र उघडं पडलंय...
पुण्यातील सामना संपल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं संघातील खेळाडूंच्या खेळाचं फारसं विश्लेषण न करता बऱ्याचशा गोष्टींवर पडदा टाकणंच पसंत केलं. पण खरं सांगायचं झाल्यास गेल्या दोन दशकांचा इतिहास असं सांगतोय की, आम्हाला डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना आत्मविश्वासानं सामोरं जाणं अजिबात जमलेलं नाहीये. अगदी दस्तुरखुद्द महान सुनील गावस्कर यांना देखील सर्वांत जास्त वेळा बाद केलंय ते इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूडनंच...मागं वळून पाहताना फिरकीच्या माहेरघरातच डावखुऱ्या फिरकी माऱ्यासमोर आपली दाणादाण उडाल्याचे अनेक प्रसंग आढळतील...
मुंबईत 2012 साली माँटी पानेसरनं इंग्लंडतर्फे 129 धावांत 5 व 81 धावांत 6 बळी खात्यात केले. तर 2015 सालच्या गाल कसोटीत श्रीलंकेच्या रंगना हेराथनं 48 धावांत 7 फलंदाजांना पॅव्हिलियनची वाट दाखवून भारताची गाळण उडविली...2017 साली पुण्यातील दोन्ही डावांत प्रत्येकी 35 धावा देऊन 6 फलंदाजांना गारद करून यजमानांचा सुपडा अक्षरश: साफ केला होता तो ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह ओकीफनं...2021 मध्ये मुंबईत न्यूझीलंडच्याच एजाझ पटेलनं 119 धावांत सर्व 10 फलंदाजांना टिपून जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतरचा तशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरण्याचा भीमपराक्रम केला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यानं 106 धावांत 4 फलंदाजांचे बळी मिळविले...याशिवाय यंदा इंग्लंडच्या टॉम हार्टलेनं हैदराबाद इथं इंग्लंडतर्फे 62 धावा देऊन 7 फलंदाजांना साफ करण्याची घटना क्रिकेट रसिकांच्या मनात ताजी असेलच...
त्यात आता भर पडलीय ती न्यूझीलंडच्या सँटनरनं दोन्ही डावांमध्ये मिळून 157 धावांच्या बदल्यात मिळविलेल्या 13 बळींची...भारतीय संघातील खेळाडूंवर लक्ष केंद्रीत केल्यास दर्शन घडेल ते बऱ्याचशा दोषांचं. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आपले ‘स्टार्स’ स्थानिक स्पर्धांना फारसं महत्त्व देत नाहीत (दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळेनं सुद्धा याच बाबीवर बोट ठेवलंय) व त्यांच्या बांधिलकीसंबंधी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात...भारतीय फलंदाजांनी एखाद्या कसोटी सामन्यासाठी अतिशय आवश्यक असलेलं बचावात्मक तंत्र वा जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर तंबू ठोकणं या दोन्ही बाबींकडे दुर्लक्षच केलंय असं खेदानं म्हणावं लागेल...
फलंदाजीचं तंत्र, संयम, संतुलन यांचे तीन तेरा वाजविण्याचं काम इमाने इतबारे पार पाडलंय ते एकदिवसीय व ‘टी-20’ सामन्यांनी. या पार्श्वभूमीवर ‘स्टार कल्चर’च्या या जमान्यात वाढलेल्या आपल्या क्रिकेटपटूंना घरगुती प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळण्यासाठी फुरसत नसते. दुर्दैवाची बाब म्हणजे यंदाच्या मोसमात रोहित शर्मा नि विराट कोहली यांनी एकही प्रथम श्रेणी लढतीत भाग घेतलेला नाहीये...न्यूझीलंडविरुद्ध निव्वळ फलंदाज म्हणून खेळलेल्या अन्य खेळाडूंचा मात्र किमान दुलिप वा रणजी चषक स्पर्धेतील एका सामन्यात तरी सहभाग राहिलाय...
रोहित अन् विराट कोहली यांनी असा पवित्रा घेण्यामागचं कारण लपलेलं असावं ते जास्त ताण पडण्याच्या भीतीतही. वैद्यकीय पथकानं तसा सल्ला सुद्धा दिलेला असू शकतो. परंतु स्थानिक स्पर्धांतील एकही लढतीत सहभागी न होणं म्हणजे जरा जास्तच झालं...रणजी व अन्य स्पर्धांत काढलेल्या धावा किंवा आलेलं अपयश यांच्यामुळं खेळाडूला आपण कुठल्या रांगेत बसलोय हे कळायला बऱ्यापैकी मदत होते. पुणे कसोटीत अफलातून ‘कमबॅक’ नोंदविणारा वॉशिंग्टन सुंदर त्यापूर्वी दिल्लीविरुद्ध घाम गाळून गाहुंजे स्टेडियमवर उतरला होता. सुंदरशिवाय भारताचा डावखुरा ‘रिस्ट स्पिनर’ कुलदीप यादवनं सुद्धा दुखापतीची पर्वा न करता प्रथम श्रेणी सामन्यात भाग घेणं पसंत केलं होतं...
रिषभ पंत, सर्फराज खान, के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, आकाशदीप, ध्रुव जुरेल अन् अक्षर पटेल यांनीही स्थानिक स्पर्धेतील एका तरी सामन्याचं तोंड पाहिलं...रोहित, विराटप्रमाणंच रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद सिराज यांनी देखील न्यूझीलंड तसंच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणं टाळलं...रोहितनं मान्य केलंय की, बेंगळूरमधील खेळपट्टीचा त्याला अंदाजच बांधता आला नाही. पण हे देखील कबूल करायला हवंय की, पुण्यातील खेळपट्टीनं सुद्धा त्याची फसगत करण्याचं काम व्यवसिथत पार पाडलं. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात त्यानं जागतिक दर्जाचा जसप्रीत बुमराह नि आकाशदीप यांच्याकडे फारसं लक्षच दिलं नाही...रोहित शर्माच्या अनुसार, भारतीय संघ फक्त दोन वेळा ढेपाळलेला असल्यानं त्यांच्यावर फारशी टीका करणं योग्य नाहीये...
परंतु भारतीय कर्णधार विसरलाय की, 2021 मध्ये अहमदाबाद कसोटीत इंग्लंडविरुद्ध यजमान संघाला केवळ 145 धावा नोंदविणं, तर 2023 साली इंदूर इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी 109 व 163 धावाच काढणं शक्य झालं होतं. खराब खेळपट्टीवरची अहमदाबाद कसोटी आटोपण्यास अवघे दोन दिवस पुरेसे ठरले, तर नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी निवडणाऱ्या रोहित शर्माच्या संघाला इंदूरमध्येही दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागलं...2020-21 मधील ऑस्ट्रेलियाच्या भूमीतील कसोटी मालिकेतही आम्हाला यजमानांनी केवळ 36 धावांतच गुंडाळलं होतं (त्याशिवाय हल्लीच श्रीलंकेतील एकदिवसीय मालिका भारतानं गमावली ती फिरकी गोलंदाजांसमोर हतप्रभ झाल्यानंच)...
असो...आता साऱ्यांचं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांवर. त्यात रोहित व विराट यांची खरी ‘कसोटी’ लागेल. सध्याचा भारतीय संघ तंत्र, संयम, दबावाला तेंड देणं, जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीला चिकटून फलंदाजी करणं यापासून दूर गेलाय हे प्रक्षिक गौतम गंभीर व कर्णधार रोहित शर्मा यांना देखील नाकारता येणार नाहीये !
गेल्या दोन दशकांत भारताला छळणारे डावखुरे फिरकी गोलंदाज
- नाव (देश) कसोटी बळी एका डावात सर्वोत्कृष्ट एका सामन्यात सर्वोत्तम
- माँटी पानेसर (इंग्लंड) 11 36 81 धावांत 6 बळी 210 धावांत 11 बळी
- हेराथ (श्रीलंका) 11 33 48 धावांत 7 बळी 115 धावांत 7 बळी
- शाकिब अल हसन (बांगलादेश) 10 25 62 धावांत 5 बळी 174 धावांत 7 बळी
- सँटनर (न्यूझीलंड) 4 23 53 धावांत 7 बळी 157 धावांत 13 बळी
- पॉल हॅरिस (दक्षिण आफ्रिका) 9 22 129 धावांत 4 बळी 179 धावांत 5 बळी
- टॉम हार्टले (इंग्लंड) 5 22 62 धावांत 7 बळी 193 धावांत 9 बळी
- जॅक लीच (इंग्लंड) 6 21 54 धावांत 4 बळी 178 धावांत 6 बळी
- एजाझ पटेल (न्यूझीलंड) 5 21 119 धावांत 10 बळी 225 धावांत 14 बळी
- डॅनियल व्हेट्टोरी (न्यूझीलंड) 6 19 135 धावांत 5 बळी 199 धावांत 6 बळी
- स्टीव्ह ओकीफ (ऑस्ट्रेलिया) 4 19 35 धावांत 6 बळी 170 धावांत 12 बळी
2021 पासून फिरकीपटूंसमोर प्रमुख भारतीय फलंदाजांचं पतन
- फलंदाज डाव फिरकीपटूंनी मिळविलेले बळी सरासरी
- रोहित शर्मा 25 19 36
- विराट कोहली 22 19 30.20
- यशस्वी जैस्वाल 13 8 89.2
- रिषभ पंत 15 8 66
- शुबमन गिल 22 14 49.10
- के. एल. राहुल 8 7 28
- रवींद्र जडेजा 18 13 37.90
भारतीय भूमीवर मालिका जिंकणारे संघ...
- देश जिंकलेल्या मालिका वर्ष
- इंग्लंड 5 1933-34, 76-77, 79-80, 84-85, 2012-13
- वेस्ट इंडिज 5 1948-49, 58-59, 66-67, 74-75, 83-84
- ऑस्ट्रेलिया 4 1956-57, 59-60, 69-70, 2004-05
- पाकिस्तान 1 1986-87
- दक्षिण आफ्रिका 1 1999-2000
- न्यूझीलंड 1 2024-2025
- राजू प्रभू