मानवी देह म्हणजे दु:खाचे माहेर होय
आठवा अध्याय
भगवंत म्हणाले, अंत्यसमयी भक्ताला देहाचा मोह पडू नये ह्यासाठी कोणताही अडथळा न येता त्याचे नामस्मरण चालू राहील ह्याची काळजी मी घेतो. ते तसे चालू राहिले की, भक्ताच्या मनात देह तात्पुरता असून आत्मा नित्य आहे हा विचार दृढ राहतो. त्यामुळे त्याला देहाचा मोह पडत नाही. त्याच्या आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून, अहंकाररूपी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी काढून, त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. माझ्या भक्तांना देहाबद्दल आपलेपणा वाटत नसल्याने त्याचा त्याग करताना त्यांना वाईट वाटत नाही. दिसताना भक्त वेगळा आणि मी वेगळा असे दिसत असल्याने त्यांच्या मरणाच्या वेळेला मी येतो आणि त्यांना आपल्या स्वरूपात मिसळून घेतो असे वाटण्याची शक्यता आहे परंतु असे घडत नाही, कारण भक्त आणि मी जिवंतपणीच एकरूप झालेलो असतो. चंद्राच्या चांदणे पाण्यात पडलेले दिसत असले तरी ते चंद्रापाशीच असते. त्याप्रमाणे भक्त शरीरात दिसत असला तरी तो भास असतो कारण तो माझ्या स्वरूपातच स्थिर असतो. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात, त्यांच्या मी नेहमीच जवळ असतो. म्हणून देह पडल्यावर ते खात्रीने माझ्यात मिसळतात. त्याचे जन्मणे आणि मरणे हे केवळ जगाला दाखवण्यापुरते असते. प्रत्यक्षात ते कायम माझ्या हृदयात रहात असतात. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, मृत्यूनंतर मजप्रत आलेल्या महात्म्यांना दु:खाचे आगर असलेला व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही.
पावले मोक्ष-सिद्धीस महात्मे मज भेटुनी । दु:खाचे घर तो जन्म न घेती चि अशाश्वत ।।15।।
सर्वसामान्य मनुष्य देहाचे महात्म्य लक्षात घेत नाही. माणसाने त्याचा देह स्वत:च्या उद्धारासाठी वापरावा अशी भगवंतांची इच्छा आहे परंतु अगदी लाखांत एखादा अपवाद वगळला तर बहुतांशी लोक त्या देहाचा उपयोग विषयांचा उपभोग घेण्यात व्यर्थ घालवतात. विषयसेवन हे नेहमीच दु:ख देणारे असल्याने जीवनात त्यांच्या वाट्याला अनिवार दु:ख येते पण ते चिकाटीने ते सहन करतात. अशा मंडळींना श्लोकाच्या विवरणात माउली मनुष्य जन्म हा दु:खाचे घर कसे आहे ते विविध गोष्टींचे दाखले देऊन समजावून सांगत आहेत. त्यामागे लोकांनी बोध घेऊन आत्मोद्धार करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असा त्यांचा उद्देश आहे.
माउली म्हणतात, माणसाचे शरीर म्हणजे दु:खरूप झाडांची बाग असून आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक ह्या तीन तापरूपी विस्तवाची शेगडी आहे. माणसाचा देह हा मृत्युरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे. माणसाच्या इच्छा आणि अपेक्षा अमर्यादित असल्याने त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने तो अनेकांचे पाय धरायला, करू नयेत ती कृत्ये करण्याला तयार असल्याने मनुष्य हीनदीन होतो. त्याचा शेवट दु:खदायक मरणात होतो त्यामुळे मनुष्य शरीर सर्व दु:खांसाठी पुरेसे भांडवल आहे. ते दुष्टबुद्धीचे उत्पत्तीस्थान व वाईट क्रियांचे फल आहे, ते मूर्तिमंत अविवेक आहे. जे संसाराचा पाया असून विकाररूपी झाडांचा बगिचा आहे. त्यामुळे त्यातून अनर्थाशिवाय काहीच पदरात पडत नाही.
क्रमश: