आरोप-प्रत्यारोपासाठी सभागृह सज्ज
आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : सत्ताधारी काँग्रेसला आव्हान देण्यासाठी विरोधकांची तयारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपासाठी सभागृह सज्ज झाले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारचे अपयश समोर आणून सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजप-निजदच्या नेत्यांनी तयारी केली आहे. तर विरोधकांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी काँग्रेसनेही सर्वप्रकारे तयारी केली असून निश्चितच सभागृहात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्मयता आहे.
विकासकामांसाठी निधी देण्यात आलेला नाही. विकासकामांसाठी निधीची कमतरता, गॅरंटी योजनांचा निधी देण्यास विलंब, मेट्रो, बस, दूध दरात वाढ, केपीएससी घोटाळा, विद्यापीठे बंद करण्याचा निर्णय, अनुसूचित जाती-जमातींचे अनुदान इतर कामांसाठी विनियोग असे मुद्दे समोर ठेवून विरोधी पक्ष सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेसनेही सभागृहात विरोधकांच्या अस्त्रांचा प्रभावीपणे तोंड देण्याची तयारी केली आहे. कर अनुदान वाटपात केंद्राने केलेला अन्याय, म्हादयी, कृष्णा, मेकेदाटू, सिंचन प्रकल्प, कोविडवरील कुन्हा समितीचा अहवाल, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावरील घोटाळ्यांबाबत केंद्राचा अनास्थेचा उल्लेख करत विरोधकांना लक्ष्य करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.
हे सर्व मुद्दे सभागृहात मांडण्यात येणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी होऊन गोंधळ निर्माण होण्याची शक्मयता आहे. हिवाळी अधिवेशनानंतर सुरू होणाऱ्या या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अनेक मुद्दे उपस्थित करून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणार हे निश्चित असून अधिवेशनाच्या कामकाजाला रंग चढणार आहे.
प्रमुख विधेयके मांडणार
या अधिवेशनात अध्यादेशाच्या स्वरुपात आधीच संमत झालेले मायक्रो फायनान्स विधेयक आणि बेंगळूर महानगरपालिकेचे विभाजन करण्यासाठी ग्रेटर बेंगळूर विधेयकासह अनेक विधेयके मांडली जाणार आहेत. याशिवाय राज्यपालांनी परत पाठवलेले ग्रामीण विकास विद्यापीठ विधेयक आणि सहकारी संस्था विधेयकासह काही विधेयके पुन्हा मांडण्याची शक्मयता आहे.
राज्यपाल संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार
आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल थावरचंद गेहलोत संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. प्रत्येक वषीच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपालांनी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सदस्यांना संबोधित करण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज या वर्षाचे पहिले अधिवेशन होणार असून राज्यपाल दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार आहेत. राज्यपालांच्या भाषणात सरकारचे ध्येय, दिशा आणि दिशा सुचवणे अपेक्षित असते.