महिन्यातील रुपयाची सर्वांधिक चमक
इराण आणि इस्रायल युद्धबंदीच्या घोषणेचा रुपयाला फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने आणि डॉलर कमकुवत झाल्याने रुपया एका महिन्यात एका सत्रात सर्वात मोठी वाढ नोंदवू शकला, असे चलन विक्रेत्यांनी सांगितले. मंगळवारच्या व्यापारादरम्यान रुपया 0.91 टक्क्यांनी मजबूत झाला.
सोमवारी, रुपया प्रति डॉलर 86.75 वर बंद झाला. मंगळवारच्या व्यापारादरम्यान रुपया 0.91 टक्क्यांनी वधारला, चालू कॅलेंडर वर्षातील एकाच व्यापार सत्रातील ही दुसरी सर्वोच्च वाढ आहे. यापूर्वी 23 मे रोजी, रुपया 0.93 टक्क्यांनी वधारला होता. एका खासगी बँकेच्या ट्रेझरी प्रमुखांनी सांगितले की, कच्चे तेल प्रति बॅरल 70 डॉलरच्या पुढे गेल्यानंतर आणि डॉलर निर्देशांक खाली आल्यानंतर, रुपयावरील दबाव पूर्णपणे कमी झाला. ते म्हणाले, ‘इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर रुपया मजबूत झाला आणि व्यावसायिकांचा त्यात रस वाढला.’ दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांकात 1.3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तथापि, ही वाढ फार काळ टिकली नाही. चालू आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया 0.5 टक्क्यांनी मजबूत झाला आहे परंतु चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत 0.4 टक्क्यांनी घसरला आहे.
मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमती 15 टक्क्यांहून अधिक घसरून 69 डॉलर प्रति बॅरलवर आल्या. दुसरीकडे, डॉलर निर्देशांकदेखील 0.2 टक्क्यांनी घसरून 98 वर आला. डॉलर निर्देशांक सहा प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजतो. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की येत्या व्यापार सत्रात रुपया मजबूत राहू शकतो परंतु 85.80 च्या पातळीवर त्याला तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो.
फिनरेक्स ट्रेझरी अॅडव्हायझर्सचे ट्रेझरी प्रमुख आणि कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी म्हणाले, ‘कच्च्या तेलाच्या कमकुवतपणामुळे रुपया 85.50 च्या पातळीपर्यंत मजबूत होऊ शकतो. एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओ व्यतिरिक्त, एफटीएसई आणि एसबीआयच्या 25,000 कोटी रुपयांच्या क्यूआयपीमध्ये पुनर्संतुलन केल्याने भारतात परदेशी गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे रुपया मजबूत होईल.’