सर्वात उंचीवरील पोस्ट कार्यालय
पोस्ट कार्यालय ही सर्वसामान्यांसाठीची सर्वात मोठी सुविधा आहे. आजच्या काळात अन्य संपर्क साधने आणि संपर्क माध्यमे हाती आल्यामुळे काही प्रमाणात पोस्टाचे महत्व कमी झाले आहे. कारण आता पोस्टकार्डे, इनलँड आदींचा उपयोग खूपच कमी होतो. तसेच पोस्टालाच जोडून असणारा ‘तार“ हा प्रकार बंदच झाला आहे. तरी आजही दुर्गम भागांमध्ये पोस्ट कार्यालय ही तेथील नागरीकांची आवश्यकता असते. आजच्या डिजिटल युगातही कागदावर स्वत:च्या हाताने लिहिलेल्या आणि पाठविलेल्या शब्दांची किंमत भावनात्मक दृष्टीने महत्वाची असते.
हिमाचल प्रदेशातील स्फिती या भागातील हिक्किम नावाच्या खेड्यात एक असे पोस्ट कार्यालय आहे, की जे जगातील सर्वाधिक उंचीवर असणारे पोस्ट आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 14 हजार 567 फूट इतकी आहे. मात्र, केवळ उंची हे त्याचे एकमेव वैशिष्ट्या नाही. तर इतक्या उंचीवर आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणात हे कार्यालय सदैव कार्यरत असते, हे त्याचे खरे वैशिष्ट्या आहे. प्राणवायूचे कमी प्रमाण आणि कडाक्याची थंडी अशा स्थितीही या कार्यालयातील कर्मचारी तेथे येतात आणि आसपासच्या जनतेला आवश्यक ती संपर्क सेवा पुरवितात. या पोस्ट कार्यालयाची किंवा ज्याला ‘डाक घर“ म्हणतात, त्याची स्थापना 1983 मध्ये झाली. तेव्हापासून ते स्थानिकांना निरंतर सेवा देत आहे. हे पोस्ट कार्यालय केवळ हिक्किम या एकाच गावाला सेवा देते, असे नाही, तर आसपासच्या लांगच्या-1, लांगचा-2, कोमिक आदी चार-पाच गावांनाही हे सेवा पुरविते. या गावांमध्ये आता मोबाईल क्रांतीने चंचूप्रवेश केला आहे. कालांतराने या पोस्ट कार्यालयाची स्थितीही अन्य पोस्ट कार्यालयांप्रमाणे होऊ शकते. तथापि, सध्यातरी ते आजूबाजूच्या गावांची संपर्क जीवनरेखा आहे असे मानले जात आहे.