For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सत्य निकेतन’ खाली दडलेले सत्य आणि दबलेल्या आशा

06:57 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सत्य निकेतन’ खाली दडलेले सत्य आणि दबलेल्या आशा
Advertisement

दक्षिण दिल्लीतील ‘सत्य निकेतन’ या अनधिकृत व जीर्ण इमारतीच्या दुर्घटनेमध्ये विद्यार्थ्यांचा बळी जाणे ही घटना मन विदिर्ण करणारी आहे. तरुण विद्यार्थी आयुष्यात काही विशेष करण्याच्या इराद्याने व जिद्दीने विविध स्पर्धा वा प्रवेश पात्रता परीक्षेसाठी दरवर्षी राजधानी दिल्लीत येतात. यासाठी त्यांच्या पालकांची हरसंभव मदत मिळते. ते विद्यार्थी त्यासाठी आपले शहर घर सोडून पात्रता परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीत येतात. मार्गदर्शन क्लासपासून प्रवास-निवासापर्यंत मोठा खर्च करावा लागतो. हे सारे या विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडतेच असे नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर  होणाऱ्या खर्चावर तडजोड करावी लागते. याच तडजोडीचा दुर्देवी परिणाम ‘सत्य निकेतन’ दुर्घटनेमुळे उघडकीस आला आहे.

Advertisement

‘सत्य निकेतन’ ही इमारत दक्षिण दिल्लीच्या प्रगत वा पॉश नागरी परिसरातील व दाटीवाटीच्या घरांसह असणारी एक बहुमजली इमारत. त्या परिसरातील या आणि अशा इमारतींमध्ये दिल्ली बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय वर्षानुवर्षे करण्यात आलेली. त्यासाठी या विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेण्यात येत असे. हे विद्यार्थी पण मुख्यत: राजधानीत येत ते विविध प्रवेश पात्रता वा स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी. या सोयी आजही बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नसल्याने दिल्लीत येणाऱ्या या विद्यार्थ्यांना अशा निवाऱ्याचाच काय तो आसरा असतो. दरवर्षी दिल्लीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी व वाढती संख्या, विद्यार्थ्यांच्या निवासाची मर्यादित उपलब्धता व त्यामुळे सततच्या कमतरतेमुळे विद्यार्थी म्हणजेच त्यांचे पालक प्रसंगी अधिकाधिक पैसे मोजून या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. यातूनच काही निवासी क्षेत्रात घरमालकांनी अवाजवी व अधिकाधिक पैसे गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वसुलण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरु केला. त्यासाठी अवैध बांधकामाचा सर्रास वापर करून अनधिकृत बांधकामाचा अवलंब केला. अरुंद निवासी क्षेत्रात बहुमजली इमारतींवर अनधिकृत मजले चढविले गेले. त्यासाठी निवासी इमारतींसाठी आवश्यक अशा हवा, पाणी, स्वच्छता, उत्तम रस्ते, वीज पुरवठा व मुख्य म्हणजे नागरी सुरक्षेसह विद्यार्थ्यांची जीवितसुरक्षा या अनधिकृत बांधकामाच्या पायदळी सर्रासपणे दिले जात आहे.

विविध परीक्षांच्या तयारीतून आपल्या करिअरसाठी राजधानीत येणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाशिवाय अन्य मुलभूत व दैनंदिन आवश्यक गरजांची पूर्ती करण्याचा व्यवसाय वाढत गेला व त्यालादेखील व्यावसायिक दृष्टिकोनातून साथ मिळत गेली ती अनधिकृत छोट्या मोठ्या व्यवसायांची. या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अशा भोजनव्यवस्था वा खानावळी, नाश्ता केंद्र, चहा, कॉफी, धोबी व्यवसाय, झेरॉक्स इ. आवश्यक गरजा लक्षात घेऊन व्यावसायिकांचे लक्ष त्याकडे स्वाभाविकपणे गेले. विद्यार्थ्यांची संख्या वाढली तशी या पूरक व मोठ्या प्रमाणात आणि हमखास फायदेशीर ठरणाऱ्या घरगुती व नित्योपयोगी व्यवसाय केंद्रांची संख्या सतत वाढत गेली. त्यामुळे या व्यावसायिकांनी पण आपला व्यवसाय आणि व्याप वाढविण्यासाठी अनधिकृत बांधकामासह प्रसंगी अतिक्रमणाचा लाभ घेण्यास सुरुवात केली.

Advertisement

दरवर्षी विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, त्यांना आवश्यक असणारी वाढती निवासी व्यवस्था व त्यातून मिळणारा तेवढ्याच प्रमाणातील वाढता पैसा यासाठी कायदे, नियम पायदळी तुडविण्याची प्रवृत्ती पण तेवढ्याच मोठ्या व वाढत्या प्रमाणावर वाढत गेली. त्याची सुरुवात झाली ती मर्यादित जागेत अमर्याद व बेकायदेशीर बांधकामाने. त्यालाच जोड लाभली ती बेकायदेशीर वीज व पाणी पुरवठ्याची. परिणामी देशाच्या सर्वच राज्यातून स्पर्धा वा प्रवेश पात्रता परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी येणारे विद्यार्थी या निवासी इमारतींमध्ये दाटीवाटीने राहू लागले.

विद्यार्थ्यांचा मुक्काम अशा निवासी इमारतींमध्ये सरासरी दोन वर्षे कालावधीसाठी असतो. त्यांचे प्रयत्न या काळात प्रामुख्याने होतात ते अधिकाधिक काळ मार्गदर्शन केंद्रांमध्ये अभ्यास-सराव यावरच केंद्रित होतात. अपुऱ्या व अरुंद इमारतीतील निवासी जागेत त्यांना रहावे लागते. या साऱ्यासाठी त्यांचे पालक मोठी रक्कम मोजतात व त्याहून मोठी रक्कम तिथे राहणारे विद्यार्थीदेखील मोजत असतात. या साऱ्यांची धडपड सुरु असते ती त्यांच्या मनाजोगत्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेद्वारे निवड होण्यासाठी अथवा केंद्रीय लोकसेवा आयोग अथवा तत्सम निवड परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी.

या साऱ्याच्या सामूहिक व सहजगत्या होणारा परिणाम म्हणजे या आणि अशा वातावरणात राहणाऱ्या व मोठ्या प्रमाणावर स्पर्धात्मक असणाऱ्या प्रवेश वा निवड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी ‘सत्य निकेतन’ सारख्या जीवघेण्या दुर्घटनेला सामोरे जाणे अपरिहार्य ठरते. मुख्य म्हणजे या साऱ्या परिस्थितीत व घर आणि कुटुंब व पालकांपासून दूर राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना  विविध प्रकारच्या ज्या ताण आणि दडपणाला सामोरे जावे लागते त्यात आता असुरक्षिततेच्या भावनेची नव्याने भर पडली आहे.

उच्च शिक्षण, संशोधन प्रवेश अथवा निवडपात्रता प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थी व त्यांचे पालक या उभयतांना आर्थिक, मानसिक व भावनिक तणावासह सुरक्षेची काळजी या नव्या समस्येची भर पडली आहे. ‘सत्य निकेतन’ दुर्घटना हिमनगासारखी म्हटली तर विषय आणि समस्येचे गांभीर्य अनेकपटींनी वाढते.

‘सत्य निकेतन’ म्हणजे सत्याचा निवास असणारी वास्तू! मात्र दिल्लीतील सत्य निकेतन दुर्घटनेमुळे स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन या आज तद्दन व्यावसायिक झालेल्या क्षेत्राचे व्यावसायिक सत्य सर्वांपुढे आले आहे. या जीवघेण्या अनधिकृत प्रकरणी प्रशासकीय कारवाई सुरु झाली असली तरी यातील मूळ सत्य म्हणजे बांधकामापासून व्यवसायापर्यंत सर्वच बाबी अनधिकृत व बेकायदेशीर होत्या.

त्याचप्रमाणे यानिमित्ताने स्पष्ट झालेली बाब म्हणजे दिल्ली असो वा कोटा त्याठिकाणी विविध प्रवेश पात्रता वा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मर्यादित कालावधीसाठी येतात व जातात. मात्र त्यांच्या वाढत्या संख्येसाठी म्हणून सर्रास व बेकायदेशीरपणे बनविलेले बांधकाम व त्यातून केला जाणारा व्यवसाय, मात्र वर्षानुवर्षे सुरुच असतो व आहे. ‘सत्य निकेतन’ प्रकरणी हेच व्यावसायिक वास्तव दडले आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.