पुढील तीन दिवस उन्हाचा कडाका वाढणार
पारा 37 सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता : हवामान खात्याकडून उष्ण तापमानाचा यलो अलर्ट
पणजी : राज्यात पुढील तीन दिवस उन्हाचा कडाका वाढणार असून उष्ण तापमानाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. गोव्यातील काही भागात उष्ण व आर्द्रतेचे प्रमाण वाढणार असून तापमानाचा पारा 35 ते 37 सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या वाढत्या उष्णतेचे परिणाम आरोग्यावर होण्याचा धोका असून लोकांनी आरोग्य सांभाळावे अशी सूचना खात्यातर्फे देण्यात आली आहे. लोकांनी तसेच प्रवासी पर्यटकांनी उष्णतेपासून सुरक्षित राहावे, दुपारचे बाहेर जाणे - फिरणे टाळावे, थेट सूर्यप्रकाशात फार वेळ थांबू नये, भरपूर पाणी प्यावे, सुती हलके कपडे घालावेत असा सल्ला खात्यातर्फे देण्यात आला आहे. यंदाच्या उन्हाळ्dयात फेब्रुवारीच्या शेवटीपासून पारा वाढत असून उन्हाचे चटके जाणवत आहेत. आणखी मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने कडक उन्हाचे असल्याने पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तीव्र उष्णतेचा त्रास माणसांसह पशु - पक्ष्यांनाही जाणवत असून पाण्याच्या शोधार्थ त्यांचे भटकणे दिसून येत आहे. काल रविवारी कमाल तापमान 36 अंश होते तर किमान तापमान 23 अंश दिसून आले. आताचा वाढलेला पारा पाहिल्यास एप्रिल - मे महिन्यात उन्हाचे चटके जास्त बसणार अशीच चिन्हे दिसत आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे काळजी घेण्याची जबाबदारी आता प्रत्येकावरच अवलंबून आहे.