आखाडा खटल्याची सुनावणीही पुढे ढकलली
प्रतिनिधी/ बेळगाव
येळ्ळूर आखाडा खटल्याची सुनावणी शनिवार दि. 3 रोजी होती. मात्र, साक्षीदार गैरहजर राहिल्याने ही सुनावणी पुढे ढकलली असून 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आलेल्या कार्यकर्त्यांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागले आहे.
येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य येळ्ळूर आखाड्यामध्ये कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या आखाड्याला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे-गुरुजी हजर राहिले होते. त्यावेळी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत योग्य उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन केले. हा एकप्रकारे आचारसंहितेचा भंग असल्याचे कारण पुढे करून भिडे गुरुजी यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रदीप देसाई, किरण गावडे, विलास नंदी, डी. जी. पाटील, मधु पाटील, दुदाप्पा बागेवाडी, भोला पाखरे, लक्ष्मीकांत मोदगेकर, मारुती कुगजी (मयत) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची सुनावणी जेएमएफसी द्वितीय न्यायालयात शनिवारी होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली असून 27 ऑगस्ट रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर हे काम पहात आहेत.