"नियोजित माणदेश जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आटपाडी व्हावे"
बहुजन समाज पार्टीचे संतोष हेगडे यांचे भजन-धरणे आंदोलन.
सांगली
महाराष्ट्र शासन २६ जानेवारी २०२५ रोजी नवीन २१ जिल्ह्याची निर्मिती करण्यासंदर्भात प्रसार माध्यमातून माहिती मिळत आहे. माण नदी असलेल्या भागांचा म्हणजेच ८ दुष्काळी तालुक्यांचा मिळून स्वतंत्र माणदेश जिल्हा होण्यासाठी व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी बहुजन समाज पार्टीचे आटपाडी - खानापूर विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष संतोष हेगडे यांनी आटपाडीत भजन-धरणे आंदोलन केले आहे. सदरचे आंदोलन पोलीस स्टेशन चौकात सुरू असून त्याला आटपाडीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी माणदेश जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मंत्रिमंडळ स्तरावर या संदर्भात अनेक अहवाल सादर झालेले आहेत. सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधील प्रामुख्याने आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा आणि माण, खटाव या तालुक्यांचे एकत्रीकरण करुन नवीन स्वतंत्र माणदेश जिल्हा निर्मिती करण्यात यावी व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आटपाडी असावे यासाठी भजन धरणे, वाघ्या मुरळी यासह विविध लोककला सादर करून अनोखे आंदोलन केले जात आहे.
'माण गंगेच्या परिसरातील म्हणजेच माणदेश जिल्ह्याच प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावं, यासाठी आम्ही भजन आंदोलन करत आहोत. या आंदोलनातून आमचा माणदेश जिल्हा स्वतंत्र व्हावा आणि या जिल्हयाचे प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी', हे आंदोलन सुरु असल्याचे बहुजन समाज पार्टीचे आटपाडी - खानापूर विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष संतोष हेगडे यांनी सांगितले.