खुद्द विद्येच्या मंदिरातील मुख्याध्यापिकाही कलंकीत!
माशेल येथील विद्यालयाची मुख्याध्यापिका गजाआड : मास्टरमाईंड दीपश्री सावंतच्याविरुद्ध लूक आऊट नोटिस, नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा घातला गंडा
फोंडा : माशेल येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून 15 लाख रूपये उकळल्याबद्दल आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल सागर नाईक (कुर्टी, फोंडा) याला अटक केल्यानंतर तपासकामाला वेग आलेला आहे. काल सोमवारी याप्रकरणी माशेल येथील शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पावस्कर (54) हिला अटक करण्यात आली आहे. तसेच मास्टरमाइं&ड म्हणून पडद्यामगे वावरत असलेल्या दीपश्री सावंत गावस हिला फोंडा पोलिसांनी फरार घोषित केले असून तिच्याविरोधात लूक आऊट नोटिस जारी केली आहे. या जॉब स्कॅमचा उलघडा गावकरवाडा उसगाव येथील पीडित तृप्ती प्रभू यांनी फोंडा पोलिसात तक्रार नोंद केल्यानंतर झाला होता. प्रभू हिची 10 लाख ऊपयांची फसवणूक केली होती.
दीपश्री सावंत प्रमुख सुत्रधार
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्याध्यापिका सुनिता पावस्कर हिचा नोकरीचे आश्वासन देऊन पैशांच्या देवाणघेवणीत सहभाग असल्याची महिती सागर नाईक याने पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. तसेच मास्टरमाईंड म्हणून दीपश्री सावंत गावस ही महिला असल्याची माहितीही पोलिसांना दिली. दीपश्री सावंत ही दीपक मेमोरियल एज्युकेशन सोसायटी माशेल येथे प्राथमिक शाळेतील शिक्षकाचे पद देण्याच्या बहाण्याने पैसे उकळण्यामागे मास्टमाईंड आहे. ती शाळेच्या पालक शिक्षक संघटनेची सदस्य होती.