मान्सूनपूर्व पावसाचा कहरच
साडेतीन इंच विक्रमी नोंद : फोंडा येथे सर्वाधिक साडेसहा इंच,रेड अलर्ट जारी,मच्छीमारांना सावधानतेचा इशारा
पणजी : गेले आठ दिवस चालू असलेल्या पावसाने कहर केला असून शुक्रवारी सकाळी 8.30 वा. पर्यंत 24 तासात साडेतीन इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मान्सूनपूर्व सुरू असलेल्या या पावसाने संपूर्ण गोमंतकीय जनतेची दाणादाण उडवलेली आहे. कमी दाबाचा पट्टा हळूहळू गोव्याच्या दिशेने सरकत असून शुक्रवारी दुपारपासून संपूर्ण गोव्याला रेड अलर्ट म्हणजे अत्यंत धोक्याचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 25 आणि 26 मे रोजी रेड अलर्ट असून या काळात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा गंभीर इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गोव्यात गेल्या आठ दिवस पाऊस चालू असून कमी दाबाच्या पट्ट्याने संकटात आणखी भर टाकली आहे. आगामी 24 तासात गोव्यात ताशी 65 ते 70 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहेल. त्याचबरोबर मुसळधार पाऊस पडणार, असा इशारा दिलेला आहे. सध्या गोव्यात शाळा, कॉलेजेस बंद आहेत अन्यथा सरकारला शाळांना सुट्टी देणे भाग पडले असते. मात्र अनेक ठिकाणी असलेले कार्यक्रम जनतेला रद्द करणे भाग पडले आहे. काल शुक्रवारी दुपारपासून जारी केलेला रेड अलर्ट हा रविवारी रात्री उशिरापर्यंत लागू करण्यात आलेला आहे. अरबी समुद्रातील जे वादळ निर्माण झालेले आहे ते गोव्याच्या दिशेने सरकत असून शुक्रवारी मध्यरात्री गोव्याला जोरदार पावसाचा तडाखा बसेल, असा अंदाज होता मात्र आज संपूर्ण दिवसभर पाऊस कोसळणार. तसेच उद्या देखील मुसळधार पाऊस गोव्याला झोपून काढणार, असा सावधानतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्याचबरोबर सोमवार 26 आणि 27 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून त्या काळातही मुसळधार पाऊस पडेल, असा सावधानतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. 28 आणि 29 मे रोजी मध्यम प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
गेल्या 24 तासात पावसाने गोव्याला पुन्हा झोडपून काढले. रात्रभर कोसळलेल्या या पावसाने पुन्हा साडेतीन इंचाची नोंद नोंदविली. सर्वाधिक पावसाची नोंद फोंडा येथे झाली असून साडेसहा इंच पाऊस पडला. धारबांदोडा आणि मडगाव येथे प्रत्येकी पाच इंच, सांखळी चार इंच, काणकोण पावणे चार इंच, म्हापसा, वाळपई येथे प्रत्येकी तीन इंच, पेडणे पावणेतीन इंच, पणजी अडीच इंच, सांगे, केपे, जुने गोवे आणि मुरगाव तसेच दाबोळी या ठिकाणी अर्धा इंच पावसाची प्रत्येकी नोंद झाली. शुक्रवारी सकाळपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. मात्र हवामान खात्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्याची नोंद कळविली नव्हती.
मान्सूनपूर्व पावसाचा विक्रम 16 इंच पावसाची नोंद
गेल्या कित्येक वर्षानंतर प्रथमच मान्सूनपूर्व पावसाची भूतपूर्व अशी नोंद झालेली आहे आणि गेले चार दिवस कोसळत असलेला पाऊस व पुढील दोन ते तीन दिवस सातत्याने कोसळणारा पाऊस विचारात घेता हा एक नवा विक्रम प्रस्थापित केला जाण्याची शक्यता आहे. या अचानक कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील धरणामध्ये पाण्याचे प्रमाण वाढत आहे. साळावली आणि अंजुणे धरणात अति वेगाने पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे यंदा प्रत्यक्षात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात मुबलक पाण्याचा पुरवठा होईल. गतवर्षी अंजुणे धरणामध्ये पाण्याचे प्रमाण एकदमच खाली उतरले होते. यंदा मुबलक पुरवठा होताच शिवाय सध्या पडणारा पाऊस आणि त्यातून येणारी पाण्याची आवकही फार वाढत आहे.
लाटांची उंची वाढणार, खोल समुद्रात जाऊ नका,मच्छीमारांना सावधानतेचा इशारा
दरम्यान, हवामान खात्याने सध्या वादळी वातावरण लक्षात घेऊन सर्व मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. लाटांची उंची आज बरीच वाढणार असल्याने आणि समुद्र सध्या प्रचंड खवळलेल्या असल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील प्रमुख बंदरावर धोक्याचा इशारा दाखवणारे बावटे देखील लावले आहेत. मान्सूनपूर्व पावसाने कहर केलेला आहे आणि पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला तर चक्क नदीनाल्यांना देखील पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गोवा सरकारने येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अत्यावश्यक सेवा सक्रिय केली आहे. तसेच सर्व मामलेदारांना आणि अत्यावश्यक सेवेला जागरूक राहण्यास सांगितलेले आहे.