गळीत हंगामाला उद्यापासून प्रारंभ
उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांना सरकारकडून परवानगी : मंत्री शिवानंद पाटील यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
दावणगेरेसह उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांना 20 ऑक्टोबरपासून ऊस गाळप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेवरून हा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती ऊस विकास आणि साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी शनिवारी दिली. त्यामुळे यंदा ऐन दिवाळीतच साखर कारखान्यांची धुरांडी पेटणार आहे.
यापूर्वी मंड्या, म्हैसूर, हासन, चामराजनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 22 जूनपासून आणि बेळगाव, विजापूर, बिदर, कलबुर्गी, बागलकोट, गदग, यादगिरी, दावणगेरे, कारवार, बळ्ळारी, विजयनगर आणि हावेरी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 1 नोव्हेंबरपासून ऊस गाळप सुरू करावे, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ऊस तोडणीला आला असून 1 नोव्हेंबरपर्यंत गाळप सुरू न झाल्यास उतारा कमी येईल. शेतकऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे शक्य तितक्या लवकर गळीत हंगाम सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती उत्तर कर्नाटकातील अनेक साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनांनी आणि शेतकरी नेत्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर 20 ऑक्टोबरपासूनच ऊस गाळप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे साखरमंत्र्यांनी पत्रकात म्हटले आहे.
आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर जुने म्हैसूर आणि इतर जिल्ह्यांसाठी स्वतंत्र ऊस गाळपाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे कारखान्यांमधील अनावश्यक स्पर्धा कमी होण्यास मदत झाली आहे, शिवाय साखर उत्पादनातही वाढ झाली आहे, असेही मंत्री शिवानंद पाटील यांनी म्हटले आहे.