तालुक्यात सुगी हंगामाची लगबग सुरू
वातावरणात कमालीचा बदल होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त : मळण्यांना ऊत
वार्ताहर/किणये
यंदा भात पोसविण्याच्या कालावधीत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहरुन आलेली पिके परतीच्या पावसाने जमिनदोस्त झाली. उर्वरीत भातपिके कापणी करून त्याची सुगी करण्यात बळीराजा व्यस्त आहे. मात्र बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंताग्रस्त बनला आहे. ऐन सुगी हंगामात ढगाळ वातावरणाने डोके वर काढल्याने आता सुगी हंगाम साधायचा कसा याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. गेल्या दहा बारा दिवसांपासून परतीच्या पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकरी भात कापणी, मळणी, भुईमूग व रताळी काढणे आदी सुगी कामाची लगबग शिवारात दिसून येत आहे. पण ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
परतीच्या पावसाने भात पिके आडवी झाली. शेतशिवारात पाणी साचले होते. दहा बारा दिवसांपासून उघडीप मिळाल्याने हे भातपीक पुन्हा वाळून आले. यामुळे या भाताची कापणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही शेतकरी कापणी केलेल्या भाताची खळ्यावरच मळणी करीत आहेत. सुगी हंगामात धान्यरुपी साठा जमा करण्याच्या कालावधीतच पुन्हा ढगाळ वातावरणाचे सावट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. तालुक्यात बासमती, इंद्रायणी, शुभांगी, सोनम, सोना मसूरा, मधुरा, भाग्यलक्ष्मी, चिंटू, इंटाण, दोडगा, जया व इतर विविध जातींची भातपिके घेण्यात आली आहेत. परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा सुगी हंगाम साधण्यासाठी धडपडताना दिसत आहे. बुधवारी वातावरणात कमालीचा बदल झाला. ढगाळ वातावरणामुळे पाऊस येणार की काय, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे.