एल निनोची टांगती तलवार
यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या मान्सूनच्या कालावधीत पाऊसमान कमीच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहणार असून, देशभर सरासरीच्या 92 टक्के पावसाची शक्यता आहे. परिणामी कृषी उत्पादन घटण्यासह महागाई वाढण्याची तसेच अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच युद्धाच्या झळांनी बेजार झालेल्या सरकारला आता पावसाच्या तुटीमुळे नियोजनाची मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे एल निनोची टांगती तलवार, हे ‘दुष्काळात तेरावा’च म्हणावा लागेल.
भारतीय मान्सूनवर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेती, उद्योग, पिण्याचे पाणी याचा साठा या पावसावर अवलंबून असते. गेल्यावर्षी मान्सूनवर ला निनोचा प्रभाव असल्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला. यंदा मात्र प्रशांत महासागरात एल निनो उद्भवण्याचा अंदाज आहे. यामुळे यंदा भारतीय मान्सूनवर परिणाम होऊन तो सरासरीच्या कमी बरसण्याची शक्यता आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने मान्सूनबाबतचा पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. यानुसार देशात अवर्षणाच्या स्थितीची शक्यता 35, सरासरीपेक्षा कमी 31, सर्वसाधारण पाऊस 27, अतिरिक्त पाऊस 6, तर अतिवृष्टीची शक्यता 1 टक्के इतकी वर्तविण्यात आली आहे. यामध्ये पाच टक्के कमी अधिकतेची शक्यता आहे. दरवर्षी साधारणपणे 87 सेंमी इतका पाऊस या चार महिन्यांच्या कालावधीत होत असतो.
उष्णतेचा पारा चढला
सध्या उष्णतेच्या लाटेमुळे दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिकट होत आहे. बिहारच्या अनेक जिह्यांमध्ये ‘उष्णतेच्या लाटे’चा इशारा जारी करण्यात आला आहे, तर उत्तर प्रदेशात शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमधील फरिदकोट आणि भटिंडा येथेही तापमान 44 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे. उष्णतेचा वाढता धोका लक्षात घेता, उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ उपचार देण्यासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात एक विशेष ‘उष्माघात विभाग’ सुरू करण्यात आला आहे. उष्माघाताची प्रकरणे त्वरित नियंत्रणात आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
ला निनो, एल निनो म्हणजे काय ?
प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या गरम पाण्याच्या प्रवाहांना एल निनो असे म्हटले जाते. मान्सून हंगामात एल निनो निर्माण झाला, तर तो नैत्य दिशेकडून भारताच्या दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे खेचून घेतो. त्यामुळे भारतात कमी पाऊस पडतो. याउलट असलेल्या परिस्थितीला ला निनो म्हटले जाते. म्हणजे प्रशांत महासागरातील थंड पाण्याच्या प्रवाहांना ला निनो असे म्हटले जाते. सध्या प्रशांत महासागरातील ला निनो (थंड पाण्याचे प्रवाह) कमकुवत होत असून, लवकरच तो तटस्थ स्थिती पोहोचेल, तर मान्सूनच्या कालावधीत एल निनो (गरम पाण्याचे प्रवाह) प्रशांत महासागरात विकसित होणार असून, त्याचा प्रभाव नैत्य मोसमी वाऱ्यांवर होणार आहे.
सध्या भारतीय महासागरातील इंडियन ओशन डायपोलची स्थिती तटस्थ स्वऊपात असून, मान्सूनच्या कालावधीदरम्यान ती पॉझिटीव्ह स्थितीत जाणार आहे. गेल्या तीन महिन्यात उत्तर गोलार्धातील बर्फाचे आवरणदेखील सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. परिणामी पावसाची ओढ यंदा जाणवणार असून, दुष्काळाची परिस्थितीदेखील उद्भवू शकते. एप्रिलपासून एल निनो हळूहळू वाढण्यास सुऊवात होणार आहे. जुलैपासूनच मान्सूनवर एल निनोचे संकट राहणार असून, जून वगळता, जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाऊस दमदार बरसण्याची शक्यता कमी आहे. यामुळे या महिन्यात पाऊस सरासरीही गाठू शकणार नाही, परिणामी संपूर्ण हंगामच तुटीचा जाण्याची शक्यता आहे. जून महिना पावसाचा बाबतीत स्थिर राहणार आहे.
‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने महिनानिहाय मान्सूनच्या पावसाची शक्यता दिली आहे. खरंतर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात जोरदार पाऊस होत असतो. मात्र, या दुसऱ्या टप्प्यावरच सर्वाधिक एल निनो प्रभाव अधिक राहणार असल्याने या महिन्यांत पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
महिनानिहाय पावसाचा अंदाज
जून महिना 101 टक्के पाऊस (165.3 मिमी)
70 टक्के सरासरीइतक्या पावसाची शक्यता
10 टक्के सरासरीपेक्षा अधिक,
20 टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची चिन्हे
जुलै महिना सरासरीच्या 95 टक्के पाऊस (280.5 मिमी)
40 टक्के सरासरीइतका
20 टक्के सरासरीपेक्षा अधिक
40 टक्के कमी पावसाची शक्यता
ऑगस्ट महिना 92 टक्के पाऊस (254.9 मिमी)
20 टक्के सर्वसाधारण
20 टक्के अधिकचा
60 टक्के सरासरीहून कमी पावसाची शक्यता
सप्टेंबर महिना 89 टक्के पाऊस (167.9 मिमी )
20 टक्के सर्वसाधारण
10 टक्के साधारण
70 टक्के तुटीच्या पावसाची शक्यता
महाराष्ट्र, गोवा-कर्नाटकात पाऊस कमी
या अंदाजानुसार, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूचा बहुतांश भाग, मध्य प्रदेश, राजस्थान गुजरातचा बहुतांश भाग, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर दक्षिण आंध्र प्रदेश, उत्तर तेलंगणा, छत्तीसगड व अंदमान बेटांच्या बहुतांश भागात पावसाची तूट राहणार आहे, तर जम्मू काश्मीर, पूर्वोत्तर भारताचा बहुतांश भाग, दक्षिण तेलंगणा, मध्य आंध्र प्रदेश येथे सरासरीपेक्षा अधिक, तर राजस्थान व गुजरातच्या काही तुरळक भागात समाधानकारक पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
या भागात दमदार पाऊस
पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतात या हंगामात सरासरीपेक्षा अधिक, दक्षिण भारतात सरासरीएवढा पाऊस राहण्याची चिन्हे आहेत. यात खासकरून केरळ, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणाचा काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशचा काही भाग व पूर्वोत्तर राज्यांचा समावेश आहे.
कृषी प्रवण क्षेत्रात अवर्षण
कृषी प्रवण क्षेत्र अर्थात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांत पावसाची कमी राहणार असल्याने पिकांना फटका बसणार आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता असून, कृषी व एकूणच अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.
एल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची बैठक
महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी राहणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेत यावर आधीच उपाययोजना करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात खरीप हंगामसाठी बैठक पार पडली. यात खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक त्या सूचना विभागास दिल्या आहेत. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक नियोजनाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसाच्या अनियमिततेमुळे पुढील वषी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन राज्य सरकातर्फे करण्यात आले आहे. राज्यातील धरणांत 2025 मध्ये 15 ऑक्टोबरला 1330.97 टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा 21 एप्रिल 2026 रोजी 653.63 टीएमसी आहे. गतवषीच्या तुलनेत यंदा सुमारे 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट 2026 अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीची सूचना करण्यात आली आहे.
ग्लोबव वार्मिंगचा अनिष्ट परिणाम
जागतिक तापमानवाढ हा सध्या कळीच मुद्दा असून, यासंबंधीचा एक अहवाल जागतिक हवामान संस्थेने प्रसिद्ध केला आहे. यानुसार हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरण आणि महासागराचे तापमान सतत वाढत आहे. तसेच बर्फ वितळत आहे. त्यामुळे पृथ्वीचे हवामान गेल्या काही वर्षांत इतिहासातील कोणत्याही काळापेक्षा अधिक असंतुलित झाले आहे. हे जलद आणि मोठ्या प्रमाणावरील बदल काही दशकांतच घडले आहेत. परंतु, त्याचे हानिकारक परिणाम शेकडो वर्षे भोगावे लागणार आहेत.
महासागरांच्या तापमानात लक्षणीय वाढ
अहवालानुसार, 2015-2025 ही आतापर्यंतची सर्वांत उष्ण 11 वर्षे ठरली आहेत. 1850-1900 कालावधीच्या सरासरीपेक्षा सुमारे 1.43 अंश सेल्सिअसने जास्त तापमानासह 2025 हे आतापर्यंतचे दुसरे किंवा तिसरे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. यामुळे जगभरात तीव्र उष्णता, मुसळधार पाऊस आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळे यांसारख्या टोकाच्या घटना घडत असून यामुळे वातावरणात बिघाड होत आहे. जगभरातील महासागरांचे तापमान वाढत आहे. मानवी वार्षिक ऊर्जा वापरातही गेल्या दोन दशकांपासून वाढ झाली आहे. आर्क्टिकमधील वार्षिक सागरी बर्फाचे प्रमाण विक्रमी नीचांकी पातळीवर आले आहे. अंटार्टिकामधील सागरी बर्फाचे प्रमाण आतापर्यंतच्या नोंदीनुसार तिसऱ्या निचांकी क्रमांकावर आले असून, यामुळे हिमनद्या वितळण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे.
आरोग्य, अर्थव्यवस्थेवर परिणाम
वाढते तापमान तसेच लहरी हवामानामुळे पिके, आरोग्य आदी घटकांवरही मोठा परिणाम होत आहे. तापमानवाढीमुळे डेंग्यूसारखे आजार मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत. तर पिकांवर लहरी हवामानाचा परिणाम होत असल्याने अन्नसुरक्षा संकटही उभे राहिले आहे.
एकूण मान्सूनच्या वाटचालीत ला निनो वा एल निनो हे दोन घटक महत्त्वाचे असतात. एल निनो वर्षांमध्ये देशाला अवर्षणाला सामोरे जावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. यंदा एल निनोचे संकट उद्भवण्याची शक्यता पाहता हे वर्ष देशासाठी कसोटीचे ठरू शकते. हे पाहता शासन, प्रशासनाला काटेकोर नियोजनावर भर द्यावा लागेल.
संकलन : अर्चना माने-भारती, पुणे