हँडब्रेक निसटला अन् ट्रेलर भुयारी पुलाच्या बांधकामात घुसला; नागाव फाट्याजवळ भीषण अपघात
नागाव फाटा येथे ट्रेलरचा भीषण अपघात;
पुलाची शिरोली -पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाटा येथील हॉटेल हिंदोळा समोरील अंडरपास भुयारी मार्गाच्या पुलाच्या बांधकामावर मालवाहतूक ट्रेलर शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आदळला. सुदैवाने यात कोणतिही जीवित हानी झाली नाही. पण ट्रेलरचे मोठे नुकसान झाले. शिवाय वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा मालवाहू ट्रेलर इलेक्ट्रिकल्सच्या मोठ्या कॉईल घेऊन मुंबईहून बेंगळुरूच्या दिशेने जात होता. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ट्रेलरचालक याने नागाव फाटा येथील हॉटेल हिंदोळाच्या शेजारी असणाऱ्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी ट्रेलर रस्त्याकडेला उभा केला होता.
चालक खाली उतरून एटीएमकडे गेला. त्याचवेळी ट्रेलरचा हँडब्रेक निसटला व हा अवजड ट्रेलर उतारावरून दोन फूट पुढे सरकला आणि थेट भुयारीपुलाच्या बांधकामात जाऊन घुसला. या भीषण धडकेत ट्रेलरचा अॅक्सेल बार तुटून गाडीचे प्रचंड नुकसानझाले.
हा अपघात घडला तेंव्हा ट्रेलरचा क्लिनर केबिनमध्ये झोपलेला होता. सुदैवाने या अपघातात त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. रात्रीची वेळ असल्याने महामार्गावर वाहतूक काहीशी विरळ असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब
सध्या महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपुलांची आणि रस्ते दुरुस्तीची कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. यामुळे सांगली फाटा, नागाव फाटा, मयुर फाटा, टोप कासारवाडी फाटा आदी परिसरात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.