For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे त्याच्यावर सद्गुरू कृपा करतात

06:38 AM Mar 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे त्याच्यावर सद्गुरू कृपा करतात
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणले, बुद्धी जोपर्यंत संपूर्ण निस्वार्थी होत नाही तोपर्यंत ती योग्य सल्ला देऊ शकत नाही. म्हणून ती निस्वार्थी होण्यासाठी वाट्याला आलेले कर्म निरपेक्षतेने करण्यास सुरवात करावी. निरपेक्षतेने कर्म करत असताना त्याच्या इच्छा आणि अपेक्षा संपुष्टात येऊ लागतील. त्यामुळे त्याच्या बुद्धीत बदल होत जाऊन ती हळूहळू पूर्णपणे नि:स्वार्थी होईल आणि मग ती योग्य तो सल्ला देऊ लागेल. परंतु असा बदल घडून येण्यापूर्वी मला आवश्यक वाटत नाही म्हणून वाट्याला आलेले कर्म मी करणार नाही असे म्हणू नये. अर्जुनाने भगवंतांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. ते ऐकून त्याच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे उत्तर येथून पुढे आपण अभ्यासणाऱ्या पाचव्या अध्यायात भगवंतांनी दिलेले आहे. ह्या अध्यायाचे नाव संन्यासयोग असे आहे. माणसाच्या आयुष्यात येणारा सगळ्यात चांगला योग म्हणजे त्याचे ईश्वराशी जोडले जाणे. तसे जोडले जाण्यासाठी ज्ञान, कर्म आणि योग असे तीन मार्ग आहेत. त्यापैकी ज्ञानमार्गाचे विवेचन भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात केले. तिसऱ्या अध्यायात कर्मयोग समजावून सांगितला. चौथ्या अध्यायात कर्मयोगाचे पालन पूर्णत: होऊ लागले की, साधकाकडून संन्यासयोग आपोआप साधला जातो असे सांगितले. आता पाचव्या अध्यायात संन्यासयोगाचे सविस्तर विवरण भगवंतांनी केले आहे.

अर्जुनाला भगवंत पूर्णपणे वश झालेले असल्याने त्याची प्रत्येक मागणी ते पूर्ण करताना त्यांना आनंद होत होता. त्याची मर्जी राखण्यासाठी ते धडपडत होते. अर्जुनाचे भाग्य थोर होते म्हणून त्याला भगवंतासारखे सद्गुरू लाभले. ते त्याच्या मनासारखं करण्यासाठी काहीही करायला तयार होते. स्वर्गात असलेली कामधेनु ही गाय ज्याला जे हवं ते देत असते. अर्जुनाच्या भाग्याची तुलना ज्याला कामधेनुसारखी आई मिळते त्याच्या भाग्याशी करता येईल. त्याने मागितला तर त्याला चंद्रसुद्धा खेळावयास मिळेल इतका तो भाग्यवान असतो. उपमन्यूच्या वाट्याला असेच भाग्य आलेले होते. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला दूधभाताकरता श्रीशंकरांनी क्षीरसमुद्र दिला. ज्याची जशी श्रद्धा असते त्याप्रमाणे त्याच्यावर सद्गुरू कृपा करतात. तेव्हा प्रत्येकाने नि:शंक होऊन सद्गुरू सांगतील ते आपल्या भल्याचंच असेल हे समजून त्यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवावी म्हणजे अर्जुनाप्रमाणे किंवा उपमन्युप्रमाणे सद्गुरूकृपेचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. येथेही उदारहृदयी श्रीकृष्ण, अर्जुनाच्या स्वाधीन झालेले असल्याने अर्जुनाला सर्व सुखांचे आगर प्राप्त होईल ह्यात काहीच आश्चर्य नाही. लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाल्याने त्याने आपल्याला हवे ते मागून घेतले आणि अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले.

Advertisement

निरपेक्षपणे कर्म करावे की, आत्मज्ञान मिळवण्यासाठी कर्माचा त्याग करून संन्यास घ्यावा ह्यातील योग्य काय ह्याविषयी अर्जुनाच्या मनात गोंधळ उडाला होता. त्याला मनातून युद्ध टाळण्यासाठी संन्यास घ्यावा असे वाटत होते. नको असलेले कर्म टाळण्यासाठी संन्यास घेण्याची पळवाट त्याला सोयीची वाटत होती. भगवंतांनीही त्याच्या म्हणण्याला रुकार द्यावा म्हणून त्याने मुद्दामहून मी काय करू ते सांगा असे विचारले होते आणि हो तुझे म्हणणे बरोबर आहे असे ते म्हणतील अशी त्याला आशा वाटत होती.

क्रमश:

Advertisement
Tags :

.