दोषींना शिक्षा झालीच पाहिजे!
प्रकरणी संघाची स्पष्ट भूमिका
► वृत्तसंस्था /नवी दिल्ली, अयोध्या
अयोध्येतील राम मंदिराला देण्यात आलेल्या दानाचा अपहार करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. यासंदर्भात सध्या जी अनिश्चितता आणि गेंधळ आहे, तोही लवकरात लवकर दूर करण्यात यावा, असे आवाहन संघाकडून करण्यात आले.
अयोध्येतील राम मंदिराची निर्मिती ही समस्त हिंदू समाजाच्या त्यागातून साकारली आहे. या मंदिराला भक्तीभावाने देण्यात आलेल्या दानाचा अपहार होणे, हे अत्यंत क्लेषकारण आणि दु:खदायक दुष्कृत्य आहे. संपूर्ण हिंदू समाजासाठी हा धक्कादायक प्रसंग आहे. या प्रकरणाचे अन्वेषण अत्यंत गंभीरपणे व्हावे आणि सर्व दोषींना शिक्षा व्हावी, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपेक्षा आहे. ‘श्री रामजन्मभूभी तीर्थक्षेत्र न्यासा’ने हे अपहारप्रकरण धसाला लावून आपले उत्तरदायित्व पार पाडले पाहिजे, असेही संघाने आपल्या आवाहनात स्पष्ट केले.
विशेष अन्वेषण दलाची स्थापना
राम मंदिर ट्रस्टमधीलच काही उच्चपदस्थांनी हा अपहार प्रथम उघड केला होता. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडे दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेश सरकारने त्वरित विशेष अन्वेषण दलाची स्थापना केली. या दलाने आपला प्राथमिक अहवाल सादर केला असून काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच अनेक प्रक्रियात्मक त्रुटीही अहवालात दर्शविल्या गेल्या आहेत.
केली जावी कठोर शिक्षा
याप्रकरणी त्वरेने तपासकार्य करून सर्व गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी. राम मंदिर व्यवस्थापनाने तसेच विशेष अन्वेषण दलाने आता कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. या अपहार प्रकरणात सर्व दोषींना शिक्षा होईल आणि रामभक्तांना न्याय मिळेल, असा विश्वास आम्हाला आहे. यापुढे राम मंदिराच्या अर्थकारणाचे व्यवस्थापन सुयोग्य प्रकारे, पारदर्शीपणे आणि उत्तरदायित्वाच्या भावनेने केले जाईल. तसेच पावित्र्य, प्रामाणिकपणा आणि उदात्त धार्मिक मूल्ये यांचे पालन करून राम मंदिर न्यास हिंदू समाजाचा विश्वास आणि श्रद्धा यांना बळकट करेल, असेही प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे.
विनय कटियार यांचे वक्तव्य
रामजन्मभूमी आंदोलनात तीन दशकांपूर्वी अग्रभागी असणारे भारतीय जनता पक्षाचे नेते विनय कटियार यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी या प्रकरणासंबंधात चर्चा केली आहे. राम मंदिर न्यासाचे महासचिव चंपत राय आणि त्यागपत्र दिलेले आणखी एक विश्वस्त या प्रकरणात कारागृहातही जाऊ शकतात, असे प्रतिपादन विनय कटियार यांनी केले आहे.
तपासाला मोठा वेग
राम मंदिर देणगी अपहारप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष अन्वेषण दलाने वेगाने तपास चालविला आहे. तपासाची कक्षा केवळ दानपेट्यांमधील अपहारासंबंधी नसून जे भूखंडांचे कथित व्यवहार झाले आहेत, त्यांचाही समावेश या तपासात करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यासाचे विश्वस्त अनिल मिश्रा यांची दोन तास चौकशी करण्यात आली. तसेच न्यासातील विशेष आमंत्रित गोपाल राव यांची सात तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणातला एक महत्त्वाचा आरोपी अविनाश शुक्ला याने अपहार करण्यात आलेला पैसा अयोध्येबाहेर नेल्याचा आरोप आहे. तसेच हा पैसा विविध मार्गाने लपविण्यात आल्याचाही त्याच्यावर संशय आहे. अनुकल्प मिश्रा याचीही भूमिका महत्त्वाची आहे. तो अनेकदा दानपेट्यांच्या कक्षात दिसून आला आहे. तसेच, अतिमहनीय व्यक्तींना दर्शन मिळवून देण्याच्या कामात तो गुंतलेला होता, असे दिसून आले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या साहाय्याने प्रकरणाची उकल केली जात आहे.
समस्त हिंदू समाजाला आवाहन
अयोध्येतील राम मंदिरातील अपहाराच्या वृत्तांमुळे हिंदू समाज दुखावला जाणे स्वाभाविक आहे. तथापि, या समस्याकाळात हिंदू समाजाने आवश्यक तो संयम आणि बंधनांचे पालन करावे, अशी विनंती आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने विशेष अन्वेषण दलाची स्थापना केली आहे. तसेच, काही जणांना अटकही झाली आहे. अशा स्थितीत हिंदू समाजाने न्यायालयीन कार्यवाहीवर विश्वास ठेवावा, असे कळकळीचे आवाहनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या वक्तव्यात केले आहे.
आणखी आरोपींना अटक होणार
ड राम मंदिर अपहार प्रकरणी आणखी काहींना अटक होण्याची शक्यता
ड राम मंदिर न्यासाचीही पुनर्रचना होणे शक्य, एसआयटीचा तपास वेगाने
ड महनीय व्यक्तींनाही होऊ शकते अटक, विनय कटियार यांचे प्रतिपादन
ड एसआयटीच्या तपासात दानपेट्यांप्रमाणे भूखंड व्यवहारांचाही समावेश