गॅरंटी योजना 2028 पर्यंत थांबविणार नाही!
बेंगळूर : पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2028 पर्यंत राज्यातील कोणतीही गॅरंटी योजना थांबविणार नाही. 2028 मध्ये पुन्हा आम्हीच सत्तेवर येणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. आमच्या गॅरंटी योजनांचा लाभ घेत असल्याबद्दल जनतेचा अपमान करणारे भाजप आणि निजद नेते जनद्रोही आहेत. कोणत्याही कारणास्तव आम्ही गॅरंटी योजना बंद करणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. हासन येथे गुरुवारी जनकल्याण मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात गरिबांसाठी गॅरंटी योजना जारी केल्या आहेत. या योजनांविषयी भाजप नेते चुकीचा संदेश पसरवत आहेत. आम्ही पाच गॅरंटी योजनांच्या माध्यमातून वर्षाला 56 हजार कोटी रुपये जनतेच्या खात्यावर थेट जमा करत आहोत. पाचही गॅरंटी योजनांचा लाभ घेणाऱ्या जनतेचा भाजप व निजद अपमान करत आहे. त्यामुळे या पक्षातील नेते जनद्रोही आहेत.
निजदच्या बालेकिल्ल्यात कुमारस्वामींवर निशाणा
विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तिन्ही जागांवर काँग्रेस उमेदवारांना निवडून आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मतदारांचे आभार मानले. मतदारांनी माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातून निखिल कुमारस्वामी यांना चन्नपट्टणमध्ये, दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्माई यांचे नातू भरत बोम्माई यांना शिग्गावमध्ये पराभूत केले. एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनण्याइतपत बहुमत या राज्यातील जनतेने कधीही दिले नाही. एकदा काँग्रेसच्या पाठिंब्यावर तर आणखी एकदा भाजपच्या मदतीने ते मुख्यमंत्री बनले. मात्र, त्यांनी दोन्ही पक्षांची फसवणूक केली. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक वेळेला सुस्थिर सरकार दिले. शिवाय दिलेले वचनही पाळले आहे. 2013 मध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे अनेक ‘भाग्य’ योजना जारी केल्या. आता अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे पाचही गॅरंटी योजना जारी केल्या आहेत, असे सिद्धरामय्या म्हणाले. केंद्रात मंत्री झालेल्या कुमारस्वामी यांनी मेकेदाटू जलाशय योजनेविषयी मौन बाळगण्याचे कारण काय?, बेंगळूरमधील जनतेला पाण्याची कमतरता आहे. या योजनेच्या माध्यमातून आम्ही बेंगळूर शहराला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, कुमारस्वामी यांनी या बाबतीत मौन बाळगले आहे, अशी टिकाही सिद्धरामय्या यांनी केली.
देवेगौडांवरही निशाणा
माजी पंतप्रधान देवेगौडा हे वक्कलिग समुदायातील नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपवत आहेत. त्यांनी बच्चगौडा, वाय. के. रामय्या, भैरेगौडा, एम. कृष्णप्पा, चेलुवरायस्वामी यांच्यासह किती तरी वक्कलिग नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपविले. मी आणि जालप्पा मिळून रामकृष्ण हेगडे यांच्याऐवजी देवेगौडा यांना मुख्यमंत्री बनविले. त्यानंतर त्यांनीच मला पक्षातून हाकलले, अशी टिकाही सिद्धरामय्यांनी देवेगौडा यांच्यावर केली.