For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अडीच कोटींचा दरोडा टाकणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

07:20 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
अडीच कोटींचा दरोडा टाकणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या
Advertisement

स्वत:च रचला दरोड्याचा कट : मुडलगी पोलिसांचा यशस्वी छडा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

मुडलगी येथील 2 कोटी 68 लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. मुडलगी पोलिसांनी सात जणांना अटक करून 2 कोटी 39 लाख रुपये जप्त केले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी ही माहिती दिली असून या प्रकरणी आणखी दोघे जण फरारी आहेत.

Advertisement

30 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास डोळ्यात मिरचीपूड टाकून 2 कोटी 68 लाख रुपयांचा दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी कलमेश बसवराज रंगापूर यांनी मुडलगी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली मुडलगीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल ब्याकुड, उपनिरीक्षक एस. डी. यडहळ्ळी, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक राजू पुजार, जी. डी. मिरजी, पी. व्ही. लोकुरे, एल. बी. गोडेद, के. सी. बागली व एस. जी. मन्नापूर आदींचा समावेश असलेल्या पथकाने दरोडा प्रकरणाचा छडा लावला आहे.

त्यांच्याजवळून 2 कोटी 39 लाख रुपये रोकड, दरोड्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली, एक कार जप्त करण्यात आली आहे. सात जणांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. 30 ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली होती. इतकी मोठी रक्कम कशी जमली? याचाही तपास करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले सर्व सातजण गोकाक व मुडलगी तालुक्यातील आहेत.

चिदानंद सिद्धारुढ कुरबेट, संजीव रामाप्पा अरभावी, राजाराम सुरेश माळ्यागोळ, रमेश दुंडाप्पा माळ्यागोळ, विठ्ठल सुरेश माळ्यागोळ, प्रकाश रामलिंगाप्पा मेळवंकी, राघवेंद्र प्रकाश कोप्पद अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. या टोळीतील रामाप्पा तळवार व मारुती अरभावी हे दोघे फरारी आहेत. हे सर्व जण संगनकेरी, ता. मुडलगी, तुक्कानट्टी व गोकाक येथील राहणारे आहेत.

चिदानंद कुरबेट या युवकाने 1 लाख रुपये रोकड दिल्यास तुमच्या बँक खात्यात 1 लाख 30 हजार रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून जमा करू, असे आमिष दाखवले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून कलमेश रंगापूर यांनी 48 लाख रुपये, त्यांचा मामा चन्नबसाप्पा यांनी 40 लाख रुपये, बिराप्पा वनसन्नी यांनी 50 लाख रुपये, कलमेश गोकाक यांनी 50 लाख रुपये, शंकर जक्कण्णावर यांनी 80 लाख रुपये दिले होते.

एकूण 2 कोटी 68 लाख रुपये रक्कम जमली. आता ज्यांनी आपल्याला मोठी रक्कम दिली आहे, त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे जमा करावे लागणार, हे लक्षात आल्यानंतर चिदानंद कुरबेटने आपणच कट रचून मोठ्या रकमेवर दरोडा घालण्याचे ठरवले. या कटाचा एक भाग म्हणून बिराप्पा वनसन्नी यांच्या शेडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी रात्री रक्कम मोजण्याचे ठरविण्यात आले. यासाठी नोटा मोजण्याऱ्या मशिनी मागविण्यात आल्या.

नोटांची मोजणी सुरू असताना ठरलेल्या कटाप्रमाणे मारुती अरभावी, संजू अरभावी, राजाराम माळ्यागोळ व इतर तीन-चार जणांनी दरोडा टाकला. शेडमध्ये चन्नबसाप्पा यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून व मारहाण करून पाच बॅगमध्ये असलेले 2 कोटी 68 लाख रुपये पळविण्यात आले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

Advertisement
Tags :

.