For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भागवताच्या एकादश स्कंधाचे महात्म्य

06:02 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भागवताच्या एकादश  स्कंधाचे महात्म्य
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

एकादश स्कंधाचे महात्म्य सांगताना नाथमहाराज म्हणाले, ह्या ग्रंथाच्या श्रवणवाचनात जे जीवन घालवतील ते परम पावन होऊन परिपूर्ण ब्रह्म असलेल्या स्वानंदाच्या कृष्णसदनी दाखल होतील कारण त्यांनी निजसखा असलेल्या श्रीकृष्णाशी सख्यत्व जोडल्यासारखेच असते. ह्या कथेत सांगितलेल्या श्रीकृष्णाच्या विचित्र लीला जे नित्य आठवतील त्यांच्याजवळ श्रीकृष्ण सतत रहायला असल्याने ते कलीकाळाला सहज हरवतील. ह्या एकादश स्कंधाचे श्रवण करून नित्य पूजन करणाऱ्यावर श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्याचा देहाभिमान निर्दाळून टाकतील. ह्या स्कंधातील प्रसंगावर मनन करून जे त्या मननाची ओंजळ फुलाच्या ओंजळीप्रमाणे तिन्ही त्रिकाळ श्रीकृष्णाच्या पायावर वाहतील त्यांनाही हरीच्याजवळ राहण्याचे भाग्य लाभेल. ह्या श्रीमदभागवताच्या वृन्दावनाचा सखोल अभ्यास करून संतसज्जनांना जमवून त्यावर जे व्याख्यान देतील आणि ते व्याख्यान जे सावध राहून ऐकतील त्यांना श्रीकृष्ण निजात्मज्ञान स्वत: देईल. ह्या एकादश स्कंधाच्या श्रवण, पठण आणि मननाने व त्यानंतर इतरांना त्याचा अर्थ सांगून बोध करून देण्याने जे पुण्य मिळेल ते इतर कुठल्याही साधनाने मिळणार नाही. हे ज्याला शक्य होणार नाही त्याने इतर काहीही न करता ह्या स्कंधाचा ग्रंथ जर ब्राह्मणाला दान केला तर त्यालाही विवेकज्ञान प्राप्त होईल. ह्या स्कंधाच्या ग्रंथाचे जो दान देईल, ह्या ग्रंथाचे पूजन करेल, ह्या ग्रंथाचे स्मरण करेल त्याचे संपूर्ण पाप नष्ट होईल. नुसते दान देऊन, पूजन करून किंवा स्मरण करून पाप कसे नष्ट होईल असे एखाद्याला वाटणे साहजिक आहे पण त्यामागचे रहस्य असे आहे की, वरील तिन्ही गोष्टी करणारा सतत एकादश स्कंधाच्या विचारात असतो. ते विचार त्याच्या मनात सतत घोळत राहतात. ह्या चिंतनामुळे त्यातील उपदेशानुसार त्यांची वर्तणूक आपोआपच होत राहते. असे पुण्यकृत्य हातून होत राहिल्याने श्रीकृष्ण कृपेने त्याच्या पापाचे निर्द्लन होते. एकादश स्कंधाचा ग्रंथ जो घरी सांभाळून ठेवेल त्याच्या घरी श्रीकृष्ण रहायला असतो. ज्याची ह्या ग्रंथावर श्रद्धा बसेल त्याचा पाठलाग करत आलेले आत्मज्ञान स्वत:हून त्याच्या पदरात पडेल. जो ग्रंथ सांभाळून ठेवेल त्याच्या हातून ग्रंथ वारंवार हाताळला जाईल, हळूहळू श्रद्धेने वाचला जाईल. त्यामुळे भगवंताच्या उपदेशामागचे रहस्य आपोआपच त्याला उमगेल आणि त्यानुसार त्याची वर्तणूक होत राहून त्याच्यातील दुर्गुण नष्ट झाल्याने त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल असे नाथमहाराजांचे सांगणे आहे. ह्यातील एखादा श्लोक, श्लोकच काय अगदी त्यातील अर्धा भाग जरी जो नित्य मनात घोळवत ठेवेल, त्यावर विचार करत राहून तोही परमपवित्र होईल अशी ह्या एकादश स्कंधाची उदारता आहे. एखादे कार्य करायला जाताना, सहज जाता जाता जरी ह्या एकादश स्कंधावर नजर जरी पडली तरी त्याची सर्व पापे कोठल्याकोठे पळून जातील. ज्याच्या हातात एकादशाचा ग्रंथ असेल त्याला देवसुद्धा वंदन करतील कारण त्याच्यात जगाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आलेले असते इतकी ह्या ग्रंथाची थोरवी आहे. सर्व पुराणामध्ये हा वनकेसरी असून ह्यातील अर्धा श्लोकसुद्धा येणाऱ्या संकटाचे विदारण करण्यास समर्थ आहे. मग ते संकट अगदी हत्तीसारखे बलिष्ट का असेना. ‘मामेकमेव शरणं’ ह्या एकाच श्लोकाचे सामर्थ्य एव्हढे आहे की, तो जो श्रद्धेने वाचेल तो हरीच्या उपदेशानुसार हरीला अनन्यभावाने शरण गेल्यामुळे त्याच्यावर असलेला मायेचा पगडा श्रीहरीच्या कृपेने उठेल, श्रीहरी त्या मायेचा गळा धरून तिला बाजूला करेल आणि त्यामुळे त्याला संसारातले मिथ्यत्व लक्षात येऊन तो आपोआपच त्यातून मुक्त होईल.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.