बसवेश्वरांचा उपदेश सातासमुद्रापार पोहोचविण्याचे कार्य महान
डॉ. प्रभाकर कोरे यांचे उ. अमेरिकेतील शरणसंगम मेळाव्यात प्रतिपादन : अमेरिकेत बसव धर्माच्या प्रचाराचे वीरशैव संघटनेकडून कार्य
बेळगाव : जगद्ज्योती बसवेश्वरांचा उपदेश सातासमुद्रापार नेऊन जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या महान कार्याला उपमा नाही. बसवादी शरणांनी स्थापन केलेल्या वीरशैव लिंगायत धर्माचे खरे वारसदार तुम्हीच आहात, अशी मुक्तकंठाने प्रशंसा केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केली. उत्तर अमेरिकेच्या ड्रेट्रॉईट शहरात वीरशैव समाजातर्फे 4 ते 6 जुलैपर्यंत आयोजित केलेल्या 47 व्या शरणसंगम मेळावा, बसवजयंती समारंभ व बसव पालखी उत्सवात सहभागी होऊन डॉ. प्रभाकर कोरे बोलत होते. बसवेश्वरांचे विचार शाश्वत आहेत. महात्मा बसवेश्वरांनी वचनाच्या (उपदेश) माध्यमातून संपूर्ण विश्वाला ज्ञान दिले. ते केवळ धर्मसंस्थापक नव्हते, तर मानव धर्माचे संस्थापक होते. समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी, समता निर्मितीसाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. अशा महान पुरुषांचे विचार आज जग स्वीकारत असून याचा आपल्याला अत्यानंद होतो आहे.
मागील 47 वर्षांपासून वीरशैव समाज संघटना अमेरिकेत बसव धर्माच्या प्रचाराचे कार्य करीत असून हे निश्चितच अभिमानास्पद आहे. आता 47 वा शरणसंगम मेळावा भरवून त्यांनी मोठा इतिहास घडविला आहे. वीरशैव समाजाचे कार्य असेच पुढेही सतत वृद्धिंगत होत राहो, अशी सदिच्छाही डॉ. प्रभाकर कोरे यांनी यावेळी व्यक्त केली. वीरशैव लिंगायत पंचमसाली जगदगुरु पीठाचे वचनानंद महास्वामी यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार जगदीश शेट्टर, माजी मंत्री मुरुगेश निराणी व शंकर पाटील मुनेनकोप्प, विधानपरिषद सदस्य प्रदीप, के. एस. नवीन, उद्योजक रविशंकर भूपळापूर, उत्तर अमेरिकेतील वीरशैव समाजाचे अध्यक्ष दयानंद, मेळाव्याचे कार्याध्यक्ष महेश पाटील, शैला बेटलूर, प्रभू देसाई, गुरुराज कोटी यांच्यासह हजारो वीरशैव लिंगायत बांधव-भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.