For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाकवी कालिदासांचे निसर्गनिरीक्षण -

06:49 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाकवी कालिदासांचे निसर्गनिरीक्षण
Advertisement

आज 15 जुलैला कालिदास दिन साजरा करताना त्यांना केवळ संस्कृत महाकवी म्हणून आठवणे अपुरे आहे. ते भारतीय उपखंडाच्या निसर्गस्मृतीचे सर्वात प्राचीन आणि सर्वात सूक्ष्म साक्षीदार आहेत. त्यांनी ढगाचा प्रवास पाहिला, ऋतूंचे बदल पाहिले, फुलांची वेळ ओळखली, प्राण्यांचे मन वाचले आणि पर्वत-नदी-वनांना मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यांच्या शब्दांतून बोलणारा मेघ आजही प्रवासमान आहे, हिमालय आजही उभा आहे, ऋतु आजही बदलत आहेत; पण प्रश्न एवढाच आहे- आपल्याकडे कालिदासासारखी पाहणारी चौकस निरीक्षक नजर अजून शिल्लक आहे का?

Advertisement

स्कृत साहित्यात कालिदासांना ‘उपमाकालिदासस्य’ म्हणून गौरविले जाते; पण त्यांच्या प्रतिभेचे खरे वैशिष्ट्या केवळ उपमांमध्ये नाही. ते भारतीय निसर्गाचे महान निरीक्षक होते. त्यांनी निसर्गाकडे राजदरबारी कवीच्या नजरेने पाहिले नाही; त्यांनी तो ऋषी, प्रवासी, वनचर, भूगोलवेत्ता आणि ऋतूंचा साक्षेपी अभ्यासक अशा अनेक दृष्टींनी पाहिला. म्हणूनच त्यांच्या काव्यातील निसर्ग हा सजावटीचा पडदा नसून अनुभवाचा, स्मृतीचा, विरहाचा आणि जीवनचक्राचा जिवंत केंद्रबिंदू आहे.

मेघदूत हे त्यांचे सर्वात अद्भूत निसर्गकाव्य आहे. संस्कृत भाषा व साहित्याचा अभ्यासक म्हणून ते माझे आवडते खंडकाव्य आहे. एका निर्वासित यक्षाने आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघाला दूत बनवून अलकानगरीकडे पाठविणे ही कल्पना जितकी काव्यमय आहे तितकीच भौगोलिक आहे. काव्याची सुऊवातच ऋतुज्ञानाने होते. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुम्। आषाढाचा पहिला दिवस, पर्वतशिखराला बिलगलेला मेघ, विरही मन आणि उत्तराभिमुख प्रवास-या सर्वांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आपल्या उपखंडातील आगमनाची अत्यंत अचूक जाणीव आहे.

Advertisement

मेघदूतातील मेघाचा प्रवास रामगिरीपासून सुरू होतो. अनेक अभ्यासक रामगिरीचा संबंध रामटेक परिसराशी लावतात; पुढे आम्रकूट, विंध्य, दशार्ण, विदिशा, उज्जयिनी, अवंती, कुऊक्षेत्र, हिमालय आणि अलका असा मार्ग उलगडतो. या मार्गाचा अभ्यास ऐतिहासिक भूगोलाच्या दृष्टीनेही केला गेला असून कालिदासाच्या वर्णनात प्राचीन भारतातील नदीप्रणाली, पर्वतरांगा, नागरी केंद्रे आणि मान्सूनचे मार्ग यांचे सुसूत्र ज्ञान दिसते. मेघदूतातील भूगोल हा कोरडा नकाशा नाही. तो हवामानाशी जोडलेला भूगोल आहे. मेघ पर्वतांवर विसावतो, नद्यांवर सावली टाकतो, वनराईला जीवन देतो, शेतकऱ्यांच्या आशा जागवतो. यक्ष मेघाला सांगतो की वाटेत पर्वत तुला विश्रांती देतील आणि नद्या तुझे श्रम कमी करतील. यामध्ये मेघाचे मानवीकरण आहे; पण त्यामागे जलचक्राची सहज समज आहे. पर्वत, नदी, वन आणि मेघ हे परस्परविरहित घटक नसून एकाच परिसंस्थेचे भाग आहेत.

कालिदासाला मान्सूनच्या दिशेचे ज्ञान होते हे विशेष लक्षवेधी आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा जलभारित मेघ, विंध्य आणि हिमालयासारख्या पर्वतरांगांशी त्याचा संबंध, नदीखोऱ्यांवर होणारा परिणाम-हे सर्व त्यांनी अनुभवले असावे. एका अभ्यासकाने यक्षाने मेघाला उंच जाऊन वेग वाढविण्याचा दिलेला निर्देश मान्सून वाऱ्यांच्या उंचीनुसार बदलणाऱ्या प्रवाहज्ञानाशी जोडला आहे. हा दावा सावधपणे घ्यावा लागेल; तरी कालिदासाच्या निरीक्षणात हवामानविषयक सूक्ष्मता आहे हे नाकारता येत नाही.ऋतुसंहारमध्ये कालिदासाची ऋतुचक्रावरील पकड अधिक स्पष्ट होते. हा ग्रंथ सहा भारतीय ऋतूंचा काव्यमय दिनदर्शक आहे. ग्रीष्मात तडफडणारे प्राणी, कोरडे जलाशय, सावली शोधणारे प्रवासी, चंद्रप्रकाशाचे वाढते आकर्षण ही केवळ रोमँटिक दृश्ये नाहीत. ती उष्णतेच्या पर्यावरणीय परिणामांची निरीक्षणे आहेत. वर्षा ऋतूत मोर नाचतात, बेडकांचे स्वर जागतात, नद्या पुराने फुगतात, शेतजमीन ओलावते आणि प्रियकर-प्रेयसींच्या मनातही नवे स्पंदन सुरू होते. शरदात पाणी स्वच्छ होते, आकाश निर्मळ होते, कमळे खुलतात. हेमंतात दव, शिशिरात थंडी आणि वसंतात नवपल्लव, मधुप आणि कोकीळ यांचे सूक्ष्म चित्रण दिसते. ऋतुसंहार हा निसर्ग आणि मानवी जीवन यांचा परस्परसंवाद दाखवणारा ऋतुवैज्ञानिक महान काव्यग्रंथ आहे.

कालिदासाची मोठी ताकद म्हणजे बदलत्या ऋतूंच्या जैविक संकेतांची त्यांना असलेली जाण. वसंत म्हणजे फक्त फुले नाहीत; तो परागकणांचा, पक्ष्यांच्या स्वरांचा, कळ्यांच्या उघडण्याचा आणि मानवी भावनांच्या जागरणाचा काळ आहे. वर्षा म्हणजे फक्त पाऊस नाही; ती जमिनीचा सुगंध, नदीप्रवाह, वनस्पतींची पुनऊत्थानशक्ती आणि प्राण्यांच्या वर्तनातील बदल यांची समग्र घटना आहे. शरदातले स्वच्छ आकाश आणि पांढरी कमळे, हेमंतातील दव आणि शिशिरातील शीतलता ही दृश्ये ऋतूंच्या संक्रमणाची अचूक नोंद घेणारी आहेत. कुमारसंभवमध्ये हिमालयाचे वर्णन तर कालिदासाच्या निसर्गदृष्टीचे शिखर आहे- “अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:।” या एका ओळीत भूगोल, अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम आहे. हिमालय हा त्यांच्या दृष्टीने पाषाणी समूह नाही; तो नद्यांचा जनक, वनस्पतींचा आश्रय, देवतांचा प्रदेश आणि तपश्चर्येचा महामंडप आहे. आधुनिक भाषेत बोलायचे तर हिमालयाला ते जैवभौगोलिक प्रदेश म्हणून जाणतात. पर्वतामुळे हवामान बदलते, नद्या जन्मतात, वनसंपदा निर्माण होते आणि मानवी संस्कृतीला आश्रय मिळतो-ही संपूर्ण पर्वतपरिसंस्था त्यांच्या काव्यात जिवंत होते.

वनस्पतींच्या बाबतीत कालिदास अत्यंत नेमके निरीक्षक आहेत. अशोक, कदंब, शिरीष, बकुळ, चंपक, आम्र, कदली, पलाश, कमळ, मालती, माधवी, पारिजात, नागकेशर अशा असंख्य वनस्पती ते नुसत्या नावापुरत्या वापरत नाहीत. त्यांचा रंग, सुगंध, फुलण्याचा काळ, स्त्राrसौंदर्याशी किंवा ऋतूशी असलेला संबंध ते ओळखतात. कदंब वर्षावाशी जोडला जातो, अशोक वसंताशी, कमळ शरदाच्या निर्मळ जलाशी, आम्र मंजऱ्या वसंताच्या संकेताशी. हे वर्गीकरण लोकपरंपरेवर आधारलेले असले तरी त्यात वनस्पतींच्या ऋतुजीवनाचे भान आहे. प्राणी-पक्षी निरीक्षणातही कालिदास विलक्षण तज्ञ आहेत. मोरांचा पावसाशी संबंध, चक्रवाक पक्ष्यांचा संध्याकाळी विभक्त होण्याचा काव्यसंकेत, हंसांचे स्थलांतर, हरिणांची भीऊता, हत्तींची जलक्रीडा, सिंहांची वनराजीतील उपस्थिती, भ्रमरांचे फुलाभोवतीचे नर्तन-ही वर्णने काव्यकल्पना असूनही नैसर्गिक वर्तनाशी विसंगत नाहीत. कालिदास प्राण्यांना प्रतीके बनवतात; पण त्यांच्या देहबोलीचा अपमान करत नाहीत. अभिज्ञानशाकुंतलम्मध्ये आश्रम-परिसंस्था अत्यंत सुंदर रीतीने प्रकटते. शकुंतला वेलींना सखी मानते, हरणे आश्रमात निर्भय फिरतात, वृक्षांचे जलसिंचन केले जाते, फुले तोडताना संयम पाळला जातो. ही वनसंस्कृती उपभोगाची नाही; ती सहजीवनाची आहे. आज आपण “मानव-वन्यजीव सहअस्तित्व” हे आवश्यक समजतो. रघुवंश मध्येही ऋतु, नद्या, समुद्र, पर्वत आणि वनांचे वर्णन राज्यकारभाराशी जोडलेले आहे. राजा हा भूमीचा रक्षक आहे ही संकल्पना वारंवार येते. निसर्गाची समृद्धी आणि न्यायप्रधान शासन यांचा संबंध कालिदास ओळखतात. पर्जन्य, अन्न, पशुधन, नदी आणि वन यांशिवाय राज्य वैभवशाली होऊ शकत नाही, ही भारतीय पर्यावरणीय राजधर्माची जाण त्यांच्या काव्यात आहे. कालिदासाच्या निसर्गदृष्टीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे निसर्ग आणि भावविश्व यांचा परस्परसंबंध. विरही यक्षाला मेघात दूत दिसतो; पार्वतीच्या तपात हिमालयाची गंभीरता दिसते; शकुंतलेच्या निरागसतेत वनाची कोमलता दिसते; वसंतात प्रणय जागतो आणि शरदात निर्मळता येते. म्हणूनच कालिदासाचे निसर्गनिरीक्षण तीन पातळ्यांवर घडते. पहिली पातळी दृश्य आहे-रंग, आकार, प्रकाश, गंध, हालचाल. दुसरी पर्यावरणीय आहे - ऋतु, पाऊस, नदी, वनस्पती, प्राणी, भूभाग. तिसरी पातळी तत्त्वज्ञानिक आहे- निसर्ग आणि मानव यांचे अद्वैत. या तीनही पातळ्या एकत्र आल्याने कालिदासाचे काव्य आजही ताजे वाटते.

डॉ.नंदकुमार मुकुंद कामत

Advertisement
Tags :

.