For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुटबॉलचे महायुद्ध

06:06 AM Jul 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
फुटबॉलचे महायुद्ध
Advertisement

फुटबॉल हा खऱ्या अर्थाने जागतिक खेळ असल्याचे यंदाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. उपांत्य फेरीत अर्जेंटिना व स्पेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश मिळवलाय. मैदानावरील हे महायुद्ध कोण जिंकणार, याकडेच आता साऱ्या जगाचे लक्ष असेल. 

Advertisement

क्री डा प्रकारांमध्ये फुटबॉल हा सर्वार्थाने परिपूर्ण खेळ म्हणता येईल. याला कारण या खेळामध्ये लागणारा कस. अशा या कसदार व क्षमतेची कठोर परीक्षा पाहणाऱ्या दमदार खेळामध्ये अंतिमत: कोण बाजी मारणार, याबाबतची उत्सुकता शिगेली पोहोचली आहे. वास्तविक ही लढाई साधी सरळ नसेल. एका बाजूला गतविजेता अर्जेंटिना, तर दुसऱ्या बाजूला नव्या पिढीच्या वेगवान आणि आक्रमक खेळाचे प्रतीक बनलेला स्पेन. मुळात ही अंतिम लढत केवळ दोन संघांमधील सामना नाही, तर  प्रगल्भ अनुभव विऊद्ध सळसळता उत्साह संयम विऊद्ध वेग आणि परंपरा विऊद्ध आधुनिकता असा हा संघर्ष असेल. अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत इंग्लंडसारख्या मजबूत प्रतिस्पर्ध्याला नमवत अंतिम फेरी गाठली, तर स्पेनने तगड्या फ्रान्सवर प्रभावी विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, त्यामुळे अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा होणार, यात शंका नाही. अर्जेंटिनाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे लिओनेल मेस्सी. वय वाढले असले, तरी त्याच्या खेळातील दृष्टी, चेंडूवरील नियंत्रण, अचूक पासिंग आणि निर्णायक क्षणी सामना फिरवण्याची क्षमता अजूनही तितकीच प्रभावी आहे. मेस्सी मैदानावर असताना अर्जेंटिनाचा आत्मविश्वास वेगळ्याच पातळीवर पोहोचतो. तो केवळ गोल करणारा खेळाडू नाही, तर संपूर्ण संघाच्या खेळाचा केंद्रबिंदू आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीला भेदण्यासाठी आवश्यक असलेली कल्पकता आणि शांतपणा त्याच्याकडे आहे. त्यामुळेच मेस्सी हा अर्जेंटिनाच्या संघाचा कणाच ठरतो. तथापि, अर्जेंटिनाची खरी ताकद केवळ मेस्सीपुरती मर्यादित नाही. शिस्तबद्ध बचाव, मधल्या फळीतील चेंडूवरील नियंत्रण आणि संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हे त्यांचे मोठे बलस्थान. मात्र, संघातील अनेक प्रमुख खेळाडू अनुभवी असल्याने स्पेनने सुऊवातीपासूनच आक्रमक खेळ केला, तर अर्जेंटिनावर बचावासाठी दडपण येऊ शकते. दुसऱ्या बाजूला स्पेनचा खेळ हा वेग, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण पासिंगवर आधारित आहे. लॅमिन यामालसारखा तऊण खेळाडू त्यांच्या आक्रमणाचा चेहरा आहे. त्याचा वेग, ड्रिबलिंग आणि बचावफळीला चकवण्याची क्षमता कोणत्याही संघासाठी धोकादायकच. स्पेनची मधली फळी चेंडूवर दीर्घकाळ नियंत्रण ठेवते आणि प्रतिस्पर्ध्याला खेळातून बाहेर ढकलण्याची ताकद ठेवते. तर निर्णायक क्षणी संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात होणारी दिरंगाई, ही संघाची कमकुवत बाजू. हा दुर्गुण त्यांना टाळावा लागेल. तसेच मोठ्या सामन्याचा दबाव काही तऊण खेळाडूंवर परिणाम करू शकतो. वास्तविक, अंतिम सामन्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशा वेळी माईंड गेम निर्णायक असतो. अर्थात या अनुभवाचा फायदा अर्जेंटिनाला मिळू शकतो. खरे तर या अंतिम सामन्यात दोन वेगवेगळ्या फुटबॉल फिलॉसॉफीचीही चुरस पाहायला मिळेल. अर्जेंटिना संयमाने संधीची वाट पाहत खेळणारा, तर स्पेन चेंडूवर नियंत्रण ठेवून प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण करणारा संघ. त्यामुळे सामन्याचा निकाल मधल्या फळीतील संघर्षावर आणि दोन्ही संघांच्या बचावफळीच्या कामगिरीवर अवलंबून राहील. आत्तापर्यंतच्या इतिहासात अर्जेंटिनाने सातव्यांदा अंतिम फेरी गाठली असून, तीनदा त्यांना विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाल्याचा इतिहास आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली चौकार ठोकण्याचा गोल्डन चान्स त्यांना असेल. मेस्सीसारखा सामना एकहाती फिरवणारा खेळाडू व संघाचा परफॉर्मन्स पाहता त्यांचे पारडे जड दिसते. स्पेनने आत्तापर्यंत एकदाच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. मेस्सीला रोखण्यासह यामालची कमाल व वेगवान खेळाचा धडाका या गोष्टी सत्कारणी लागल्या, तर त्यांच्यापासून जेतेपद दूर नसेल. फुटबॉलच्या या महायुद्धात अनुभवसिद्ध आक्रमकता तसेच चापल्ययुक्त वेग यात कशाची सरशी होते, हेच आता पहायचे.

Advertisement

Advertisement
Tags :

.