पालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा
महाराष्ट्रात भाजपची शतकी मजल तर एकनाथ शिंदेसेना डार्क हॉर्स : महाआघाडीमध्ये काँग्रेस ठरला बडेभैय्या : कार्यकर्त्यांचा जल्लोष
प्रतिनिधी/ मुंबई
या निवडणुकीच्या निकालांमुळे भाजप किंवा महायुतीतील पक्ष स्वबळावर लढल्यास निकाल कसे असतील, याची चुणूक किंवा धडे दिले आहेत. त्यातूनच महायुतीची किंवा भाजपला मित्रपक्षांची गरज आहे, हे अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे. स्वतंत्र लढल्याने काय होऊ शकते याचा अंदाज आधीच आल्याने भाजपने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितींसाठी महायुती म्हणून लढणार असल्याचे आणि त्यातही शिंदेसेनेला बरोबर घेऊन लढणार असल्याचे या निवडणुका जाहीर होताच स्पष्ट केले आहे. परिणामी त्या निवडणुकांमध्ये वेगळे चित्र दिसण्याची शक्यता आहे.
भाजपची गतिमान आघाडी
महायुती म्हणून या निवडणुका लढल्या गेल्या असल्या तरी भाजपने स्वीकारलेले आक्रमक धोरण प्रकर्षाने दिसून आले. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा वेगवान प्रचाराचा गतिमान अनुभव मतदार आणि सर्व राजकीय पक्षांना दिसून आला. भाजपची ही आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमधील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही उत्कृष्ट कामगिरी नोंदवल्याचे या निकालावरुन दिसून येत आहे.
कोकणातही गुहागर आणि देवरुखमध्ये नगराध्यक्ष निवडून आलेत. हा प्लस पॉईंट आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी यापूर्वी 2029 ची निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल, असे म्हटले होते. त्याची ही पायाभरणी झाली आहे, असे म्हणता येईल. परंतु सध्या तरी भाजपला आपल्या मित्र पक्षांना डावलता येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.
डार्क हॉर्स शिंदेसेनेची मुसंडी
शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा करिष्मा कायम राखला आहे. मतदारांना हीच शिवसेना खरी आहे, हे गळी उतरवण्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे. त्यांनी 54 जागी आपला नगराध्यक्ष निवडून आणत अर्धशतक गाठले आहे. या जोरावर त्यांनी आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आपले आव्हान असेल, हे दाखवून दिले आहे.
ज्या कोकणवासियांनी जुन्या शिवसेनेला कायम आपले मानले त्या कोकणवासियांनी शिंदेसेनेला आपले मानल्याचे या निकालावरुन दिसून येत आहे. प्एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले, निलेश राणे यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या शिवेसना पक्षाचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पारंपरिक वारसा असलेल्या ठाकरे गटाला पूर्णपणे पिछेहाट स्वीकारावी लागली आहे. विदर्भातही शिंदेसेनेला चांगला पाठिंबा प्राप्त झाला आहे.
शहाजीबापूंना हिणवले, त्यांनी करुन दाखवले
सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेनं भाजप, शेकापच्या पॅनेलला पराभूत केलं. येथे भाजपचे मंत्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचाराचा जोर लावला. पण त्यांचा करिष्मा दिसला नाही. सोलापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नाशिकमध्ये 11 पैकी 5, पालघर आणि डहाणू येथे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणत त्यांनी शिवसेनेची आघाडी दाखवून दिली आहे.
अजित पवारांनी पॉवर दाखवली
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 40 नगरपरिषद आणि नगरपंचायतीत नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. पुणे जिह्याच्या होम ग्राऊंड आहे, येथे आपल्याला अद्याप तरी पर्याय नाही, असे दाखवून दिले आहे. त्यांनी कोणताही आक्रमपणा न दाखवता संयमी प्रचाराने राष्ट्रवादीचे घड्याळ सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुणे जिह्यातील 17 नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी 10 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीत नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. कोल्हापूर, बीड जिह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने अडचणीतही चांगली कामगिरी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने 34 नगरपरिषद आणि नगरपंचायतीत नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. चंद्रपूर जिह्यात काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. अहिल्यानगर, कोल्हापूर जिह्यात काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तथापि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मात्र 7 ठिकाणी नगराध्यक्ष निवडणून आणता आले आहेत. जयंत पाटील यांच्या उरुण ईश्वरपूर, आष्टा नगरपालिकेत पक्षानं यश मिळवलं. रायगडमधील उरण येथे त्यांनी यश मिळवले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातीलच तासगावमध्ये झालेली पिछेहाट सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी आहे. उद्धव ठाकरे गटाने या निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निर्णय सोपवले होते. त्यांचे 8 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. सोलापूरमधील कुर्डूवाडी, रायगडमधील श्रीवर्धन यासह इतर ठिकाणी शिवेसना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष विजयी झालेत. इतर पक्षीयांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं अकोल्यातील बार्शी टाकळी आणि अमरावतीमधील चांदूर रेल्वे नगरपरिषेदत नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. स्थानिक आघाड्यांचे 23 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेत.
महापालिकेसाठी युतीचे प्रयत्न ?
महायुतीतील पक्षांनी या निवडणुकीत 75 टक्के जागा पटकावल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी त्यांचे मनोबल वाढले आहे. पण त्यासाठी युती न केल्यास एकमेकांमध्ये लढून महाविकास आघाडीतील पक्षांचा फायदा अधिक होईल, का असा विचार आता सुरु झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी युती नसेल, तेथे या पक्षांमध्येच प्रामुख्याने लढत होईल. भाजपने 51 टक्के मते मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, मात्र अनेक ठिकाणी तेवढी मते व त्या जागांवर विजय मिळविण्यात भाजप कमी पडत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे व पवार गटाची ताकद वाढल्यास ते भाजपला 2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तापदायक ठरणार आहे. त्यामुळे भाजपची आगामी धोरणे काय असतील, याकडे राजकीय तज्ञांचे लक्ष असेल.
आताही महाआघाडीला झटका
विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना फटका बसला आहे. परंतु महायुतीच्या तुलनेत ठाकरे आणि शरद पवार गटाने या निवडणुका फारशा प्रतिष्ठेच्या केल्या नव्हत्या. प्रामुख्याने ठाकरे गटाचे लक्ष मुंबईसह मोठ्या महापालिकांवर केंद्रीत आहे. तर शरद पवार गटाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर लक्ष केंद्रीत केले आहे, असे राजकीय धुरिणांना वाटते. तर विधानसभेच्या तुलनेत काँग्रेसला अधिक यश मिळाले आहे. विशेषत: विदर्भात काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले. चंद्रपूर जिह्याने काँग्रेसला हात दिला आहे. काँग्रेससाठी तेवढाच दिलासा ठरला आहे.