स्वबळाच्या चाचणीत महायुतीच विजयी
राज्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालात भाजपने 117 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 53 जागांवर विजय मिळवला. महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने 37 जागांवर विजय मिळवला, महायुतीतील तीनही पक्षाने या निवडणुका एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढवल्या. मात्र निकालानंतरचे यश मात्र महायुतीला मिळाले. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीने महामुसंडी मारली तर महाविकास आघाडीची महाघसरगुंडी उडाल्याचे निकालात दिसले. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना विरूध्द भाजप तर काही ठिकाणी शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अजित पवार गट असा सामना बघायला मिळाला, मात्र यात फायदा झाला तो शेवटी, महायुतीची ही स्ट्रॅटेजी विरोधकांना पुन्हा मुठभर वऊन चिमुटभर करण्यात यशस्वी झाली. आता लवकरच महापालिका निवडणुका होत आहे, या निवडणुकीत देखील महायुतीचा कोणताफॉर्म्युला असणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात 2014 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांची शिवसेना ही सरकारचा घटक पक्ष म्हणून भाजपसोबत सत्तेत होती, नरेंद्र मोदी यांच्या उत्कर्षानंतर भाजप आणि शिवसेनेला राज्यात लोकसभा आणि विधानसभेला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यावेळी देखील राज्यातील विरोधी पक्ष असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही निष्प्रभ होती. विरोधकांना मोजायचेच नाही सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही भूमिका आपणच निभवायच्या, विरोधकांना स्पेसच शिल्लक ठेवायची नाही, हे त्या सरकारपासून सुरु झाल्याचे अधिक प्रकर्षाने दिसले.
म्हणजे कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला भाजपने मान्यता द्यायची, सरकारमधील दुसरे मित्रपक्ष शिवसेना नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी वेळ पडली तर सरकारमधून बाहेर पडायचा इशारा द्यायची, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाणार रिफायनरी रद्द केल्याची अधिसुचना काढायची. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उध्दव ठाकरे शेतकऱ्यांना पिक विमा देणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात मुंबईत भला मोठा मोर्चा काढायचा, मग उध्दव ठाकरेंच्या मागण्या मान्य व्हायच्या. म्हणजे सत्ताधारी पण आपण आणि विरोधक पण आपण असे चित्र त्यावेळी होते. शिवसेनेचे मंत्री तर राजीनामा खिशात घेऊन फिरायचे. त्यावेळेपासून सत्ताधारी आणि विरोधक हे एका रथाची दोन चाके नसून, सरकारचा एकच रथ असल्याचे दिसले. आता तर राज्याला विरोधीपक्ष नेता पण नाही. घरातल्या दोन भावांमध्ये भांडण असते, दोघांमध्ये संपत्तीची वाटणी होते पण संपत्ती तर अखेर घरातच राहते. याच स्ट्रॅटेजीवर महायुतीने काम केले.
कालचे निकाल पाहिल्यानंतर सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र लढले असले तरी एकत्रित यश हे महायुतीच्याच वाट्याला आले. त्या तुलनेत महाविकास आघाडी मात्र रणनीती आखण्यात अपयशी ठरली आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसला काही ठिकाणी यश मिळवता आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रचारसभांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या तुलनेत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तर प्रचारात उतरलेही नव्हते असेच चित्र होते.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विजय महायुतीचा आत्मविश्वास वाढविणारा ठरणार हे निश्चित. भाजपने 288 पैकी 117 नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचा स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास या निकालाने वाढवला आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेल्या 53 जागा, त्या देखील भाजप शिवाय लढल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी वाढली आहे. तीन चाकांच्या रिक्षात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चाक मात्र डळमळीत होताना दिसत आहे. अजित पवारांनी आपला बालेकिल्ला सांभाळला, मात्र अजित पवार यांचा पर्याय निवडणारा मुस्लिम आणि दलित मतदार हा काँग्रेसच्या वळचणीला पुन्हा जात असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसला मिळालेल्या 28 जागांमुळे काँग्रेस पक्ष हा शिवसेना उध्दव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुलनेत अधिक व्यापक होताना दिसत आहे. त्यामुळे विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांसाठी ही धोक्याची घंटा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संपुर्ण राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार केल्याचे या निकालात दिसून आले. ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने लढत होता, त्या ठिकाणी लोकांनी भाजपपेक्षा शिंदे यांच्या शिवसेनेला पर्याय म्हणून पाहिल्याचे दिसले. उध्दव ठाकरे तर मुंबई बाहेर फिरकले देखील नाही.
ठाकरे यांना मुंबई आणि ठाणे महापालिका यातच अधिक रस आहे, तरी देखील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा दोन जागा अधिक म्हणजे 9 जागा मिळाल्या, यावऊन ठाकरे यांना अजुनही सहानुभुती असल्याचे दिसत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटच एकमेकांच्या विरोधात लढत होते, प्रचारात तर महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष इतका टोकाला गेला की, प्रमुख नेत्यांना मध्यस्थी करावी लागली. मग ते संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकळे वाद असो, कोकणात आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेला आरोप असो किंवा सांगोल्यात शहाजी बापु पाटील यांनी भाजपच्या मंत्र्यांवर केलेला आरोप असो. अखेर या सर्वच ठिकाणी महायुती एकमेकांच्या विरोधात लढली आणि महायुतीच जिंकली. आगामी काळात राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजप आणि शिवसेना काही ठिकाणी युतीमध्ये लढणार असल्याचे सध्या तरी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये होत असलेल्या संयुक्त बैठकांमधून दिसत आहे तर राष्ट्रवादी अजित पवारांना महायुतीतून डावलले जात असल्याचे दिसत आहे. एकीकडे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत असल्याचे दिसत आहे, दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा देतानाच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी बरोबर युतीची बोलणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसला नगराध्यक्ष निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसचा स्वबळाचा दावा अजुन प्रबळ झाला आहे, तर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधीही होऊ शकते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
शहरी मतदारांचा कौल हा नेहमी राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक नेतृत्व आणि विकास याला राहिला आहे. त्यामुळे महायुती म्हणून महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना नगरपालिका निवडणुकांसारखी नुरा कुस्ती खेळणार की युतीची घोषणा करून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे