महायुतीची परिस्थिती पहाता मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात वारंवार यावं लागेल- जयंत पाटील
राज्यातील महायुतीची एकूण स्थिती पाहता बरी नसून महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळणारा पाठींबा बघून त्यांच्या पायाखालील वाळू घसरली आहे. त्यामुळे हातकणंगलेसाठी मुख्यमंत्र्यांना अजून आणखी बऱ्याच वेळा कोल्हापुरात यावम लागणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडी आघाडीने मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून शाहू महाराज आणि सत्यजित पाटील सरूडकर यांचा अर्ज भरला. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. आजच्या रॅलीला जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "महाविकास आघाडीला महाराष्ट्रात लोकांचा पाठींबा वाढतोय. कोल्हापुरातही शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आले आहेत. त्यामुळे आजची गर्दी पहाता महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा विजयी होणारच." अशी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांना सारखं कोल्हापूरात यावं लागेल....
पुढे बोलताना त्यांनी "शाहू छत्रपती महाराजांनी रयतेची किती सेवा केली याची करवीर नगरीला जाणिव आहे. महायुतीचे उमेदवार जाहीर करताना त्यांना किती त्रास होतोय हे पाहतोय. महायुतीची एकूण स्थिती पाहता परिस्थिती बरी नाही हे महायुतीच्याही ध्यानात आले आहे. हातकणंगलेबाबत मुख्यमंत्री दोन दिवस कोल्हापूरात होते. अजूनही बऱ्याच वेळा मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात यावं लागेल." असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचा एकच उमेदवार...
सांगलीतील राजकिय पेचावर भाष्य करताना त्यांनी सांगलीतील वाद लवकर मिटावा हीच इच्छा असल्याचं सांगितलं. सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा. शिवसेनेनेही यापूर्वी आपला उमेदवार घोषित केला असल्याची आठवण करून दिली.
200 पार होतानाही नाकी नऊ...
भारतीय जनता पक्षाच्या मनात सातारच्या जागेबद्दल आत्मविश्वास नाही. उदयनराजे यांना उमेदवारी द्यायची की नाही असा संभ्रम होता. त्यामुळेच उमेदवारी द्यायला इतका उशीर घेतला. 400 पार करणं ही फार मोठी गोष्ट आहे. 200 पार होतानाही नाकी नऊ येतील असेही त्यांनी म्हटलं आहे.