देशद्रोही कारवाया करणारी ग्रामपंचायत बरखास्त करावी
आम्ही भारतीय शिवाजी पेठेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
नवीन मुस्लिम मतदारांची नांवे मतदार यादीत नोंदवू नयेत असा ठराव करणारी करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी आम्ही भारतीय शिवाजी पेठेच्या वतीने करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.
सर्व भारतीयांची नांवे मतदार यादीत नोंदली जावी, प्रत्येकाने मतदान करावे आणि विकासाच्या निर्णयात सहभागी व्हावे यासाठी देशाच्या स्वातंत्र्यापासून प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी धर्मावरुन एखाद्याला मतदान नोंदणीपासून वंचित ठेवणे ही बाब निषेधार्ह आहे. मतदारांना धर्मावरुन तपासण्याचे, रोखण्याचे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नाहीत.
करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीने नुकताच नवीन मुस्लिम मतदारांची नांवे मतदार यादीत नोंदवू नये असा देशद्रोही ठराव केला आहे. यामुळे असे वर्तन करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही भारतीय शिवाजी पेठेच्या वतीने केली आहे. देशद्रोही ठराव करणारी ग्रामपंचायत त्वरित बरखास्त करावी, देशद्रोही गुन्हयात सहभागी असलेल्या सदस्याला दहा वर्षे निवडणूक लढवण्यास मज्जाव करावा, देशद्रोही घटनेला साथ देणाऱ्या ग्रामसेवकाची चौकशी करुन कारवाई करावी, समाजात बंधुभाव वाढवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपक्रम घ्यावेत, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना भारतीय संविधनाचा अभ्यासक्रम सक्तीचा करावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, चंद्रकांत सूर्यवंशी, आनंदराव चौगुले, रवींद्र चव्हाण, सुहास साळोखे, अमर जाधव, अमृत शिंदे, सोमनाथ आयवारे उपस्थित होते.