वृक्षतोड दंड निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा - मंगेश तळवणेकर
सावंतवाडीत शेतकरी मेळावा संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी
वृक्षतोडीच्या ५० हजारांच्या भुर्दंडासह आरोग्याचा प्रश्न सोडवण्यात सत्ताधाऱ्यांसह प्रशासनही कमी पडले. पर्यायाने शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपला स्वाभिमान दाखवा असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी शेतकऱ्यांना केले. श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्यावतीने सावंतवाडी शहरातील गांधी चौकात शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात मंगेश तळवणेकर बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९० टक्के शेतकरी व १० टक्के लाकूड व्यावसायिक आहेत. त्यांच्या पुर्वजांनी वेगवेगळी झाडे लावलेली असून त्यांच्या पश्चातही झाडे लावली जातात. आपल्या अडीअडचणींना ही झाडे विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतात. मात्र शासनाच्या एका झाडाला ५० हजार रुपयाच्या अन्यायकारक निर्णयांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व लाकुड व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहेत. त्यामुळे या वृक्षतोड दंड निर्णय विरोधात जिल्ह्यातील लाकूड व्यावसायिक आणि शेतकरी संघटित झाले. शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष बाब म्हणून विचार करुन या वृक्षतोड दंड निर्णयाचा फेरविचार करावा अशी लाकूड व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची मागणी आहे.
यावेळी मंगेश तळवणेकर म्हणाले, माझा कुठल्याही पक्षावर रोष नाही. परंतु, जो कोण आमचा हा प्रश्न सोडवण्याचा शब्द देईन त्याच्या पाठीमागे आम्ही राहणार आहोत. त्यामुळे आत्ता ही सुरुवात असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. शेतकऱ्यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून एकसंघ होणे गरजेचे आहे.