सरकारने केपीएस-मॅग्नेट योजना रद्द करावी
एआयडीएसओची मागणी : योजनेमुळे विद्यार्थ्यांवर होणार परिणाम
बेळगाव : राज्य सरकारने राज्यात 700 केपीएस-मॅग्नेट योजना शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 3 ते 5 कि.मी. अंतरावर असलेल्या शाळांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे याचा हजारो विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे. सरकारने शाळांचे विलिनीकरण न करता आहेत त्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा पुरवाव्यात. तसेच केपीएस-मॅग्नेट योजना त्वरित बंद करून मुलांना दिलासा द्यावा, अशी मागणी एआयडीएसओच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात, केपीएस-मॅग्नेट योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून विविध ठिकाणांच्या शाळांचे विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचा शेकडो विद्यार्थ्यांवर परिणाम होणार असून त्यांना प्रवास करून शाळेला जावे लागणार आहे. राज्यातील हजारो शाळा 700 केपीएस-मॅग्नेट शाळांमध्ये विलिन करण्यात येणार आहेत. आधीच सरकारी शाळांमधील पटासंख्या कमी होत चालली आहे. यामुळे सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे.
राज्यात हजारो शिक्षकांची पदे रिक्त असून मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तसेच सरकारी शाळांमधील इमारतींची दयनीय अवस्था असून शौचालयांची स्थितीही वापरण्यायोग्य नसल्यासारखी आहे. यामुळे राज्य सरकारने सरकारी शाळांमधील गुणवत्ता वाढवून शाळांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात. तसेच विद्यार्थ्यांना समस्या होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्य सरकारने केपीएस-मॅग्नेट योजना बंद करण्याची मागणीही करण्यात आली.