डेटवर जाण्यासाठी पैसे देते सरकार
रेस्टॉरंट-सिनेमाला जाणे फ्री : विवाह निश्चित होताच मिळतात 25 लाख
सध्या दक्षिण कोरिया अजब स्थितीला सामोरा जातोय. देशाचा विकास होत असला तरीही लोक स्वत:च्या कामात इतके व्यग्र झाले आहेत की त्यांच्याकडे वैयक्तिक नातेसंबंधांसाठी वेळच नाही. सकाळी उठल्यावर लोक थेट ऑफिसला जातात, यानंतर दिवसभराचे काम आणि मग संध्याकाळी आराम. कुठलीच डेटिंग लाइफ नाही आणि कुणी याच्या फंदात पडू इच्छित नाही. अशास्थितीमुळे देशात प्रजनन दर अत्यंत खालावला आहे.
दक्षिण कोरियाच्या सरकारने आता याप्रकरणी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोकांना आता डेटवर जाण्यासाठी पैसे मिळू लागले असून विवाहाचा खर्चही सरकार उचलत आहे. तसेच विवाहानंतर जन्माला येणाऱ्या अपत्याची जबाबदारीही स्वीकारण्यास सरकार तयार आहे. लोकांनी नातेसंबंध जोडून मुलांना जन्म द्यावा याकरता सरकार लोकांच्या खात्यात चांगली रक्कम जमा करण्यास तयार आहे.
दक्षिण कोरियात जर एखाद्या व्यक्तीने पार्टनरसोबत डेटवर जाण्याचा निर्णय घेतला तर कुठलाच खर्च करावा लागणार नाही. कोरियाचे सरकार डेटवर जाण्यासाठी लोकांना 350 डॉलर्स म्हणजेच सुमारे 31 हजार रुपये रुपये देते. या रकमेतून संबंधितांना रेस्टॉरंटमध्ये बसून खाता येते, चित्रपट पाहता येतो किंवा एकत्र कुठलीही कृती करता येते. डेटमध्ये जर संबंधितांच्या पालकांची भेट घेतली जात असेल तर यासाठीही सरकार वेगळा खर्च करण्यास तयार आहे.
विवाहासाठी प्रोत्साहन
दक्षिण कोरियात विवाह करणाऱ्या जोडप्याला 25 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळते. याचबरोबर अपत्य जन्माला आल्यावर वेगळी रक्कम दिली जाते. येथे लिव्हिंग कॉस्ट अत्यंत अधिक झाल्याने अनेक जोडपी महागाईमुळे मूल जन्माला घालणे टाळत आहेत. लोक स्वत:च्या कारकीर्दीत व्यग्र असल्याने सरकारच लोकांना आर्थिक प्रोत्साहन देत नात्यात गुंतवू पाहत आहे.