हलशी कदंबोत्सवाचा सरकारला विसर
केवळ दोनच वर्षे साजरा : यंदा उत्सवाबाबत अनिश्चितता
बेळगाव : इतिहासात कदंब घराण्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हलशी (ता. खानापूर) येथे कदंबकालीन मंदिरे, शिल्पकला असून, गाव पर्यटनस्थळ बनले आहे. दहा वर्षांपूर्वी हलशीमध्ये कदंबोत्सव साजरा झाला होता. त्यानंतरच्या काळात कदंब उत्सवाचा सरकारला विसरच पडला आहे. 2014 व 2015 मध्ये 12 व 13 फेब्रुवारीला कदंबोत्सव साजरा झाला होता. 2016 मध्ये उत्सवाचे नियोजन सरकारकडून झालेले नव्हते. उत्सव होण्याबाबत अनिश्चितता दिसून आल्याने उत्सवाबाबत प्रशासन व सरकारकडे सतत विचारणा होऊ लागली. अखेर सरकारने दखल घेत ऑक्टोबरमध्ये कदंबोत्सवाचे आयोजन करून उत्सव यशस्वी केला होता. त्यानंतरच्या सरकारच्या काळात उत्सव झालाच नाही. प्रतिवर्षी उत्सवाचे आयोजन करून इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला पाहिजे. कदंबोत्सवाचे आयोजन करून उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व कार्यक्रमात मराठीला स्थान द्यावे, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
कदंबोत्सवाबाबतच अनास्था का?
हलशीतील कदंबोत्सवाबाबत सरकारकडून अद्याप हालचाली सुरू नाहीत. कित्तूर उत्सव, बेलवडी मल्लम्मा उत्सवासाठी जिल्हा प्रशासन उत्साह दाखविते. पण, तत्कालिन काँग्रेस सरकारनेच सुरू केलेल्या कदंबोत्सवाबाबत अनास्था का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.