For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑलिम्पिक आयोजनाचे सुवर्णस्वप्न

06:58 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑलिम्पिक आयोजनाचे सुवर्णस्वप्न
Advertisement

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : 2036 ऑलिम्पिक भारतात आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करताना 2036च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचे देशाचे सुवर्णस्वप्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यासाठी आपण तयारीलाही सुरुवात केल्याचे मोदींनी लाल किल्ल्यावर गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात केले. भारतासह सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की हे देश ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुक आहेत. पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (आयओसी) निवडणूक होणार असून त्यानंतर यजमानपदाबद्दलचा निर्णय अपेक्षित आहे. याशिवाय, ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या  खेळाडूंशी त्यांनी गप्पा मारल्या. तसेच पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

गतवर्षी सप्टेंबरमध्ये जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन करून भारतातील विद्यामान पायाभूत सुविधांचे दर्शन जगाला घडवले. याशिवाय, अनेक मोठे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करण्याची आमची क्षमता असल्याचे मोदी यांनी नमूद केले. भारताच्या ऑलिम्पिक आयोजनाच्या महत्त्वाकांक्षेला ‘आयओसी‘ अध्यक्ष थॉमस बाख यांचा पाठिंबा आहे. 2010 राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भारताने कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. यामुळे भारतात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद कोणाला मिळेल याचा निर्णय घेते. 2028 ऑलिम्पिकचे यजमानपद अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहराकडे सोपवण्यात आले आहे. 2032 ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार आहेत. 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यात भारताला यश आले तर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय खेळाडू त्यांच्या देशात त्यांच्या चाहत्यांसमोर खेळतील.

याशिवाय, आपल्या भाषणात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी भारताचा गौरव केला आहे, अशा सर्व खेळाडूंचे देशवासियांच्यावतीने अभिनंदन करतो असेही ते यावेळी म्हणाले.

पॅरालिम्पिक संघाला दिल्या शुभेच्छा

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे आणखी एक पथक पॅरालिम्पिकसाठी रवाना होणार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान म्हणाले. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदके जिंकली होती, ज्यात पाच सुवर्णपदकांचा समावेश होता. यावेळी 84 खेळाडूंचे पथक स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे. भारतीय संघ पॅरालिम्पिकमध्ये नक्कीच दर्जेदार कामगिरी करेल, असेही ते यावेळी म्हणाले.

मनू भाकर, हॉकी संघाने दिली पंतप्रधान मोदींना अनमोल भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकवीरांची गुरुवारी आपल्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंशी संवाद साधला. भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने आपली जर्सी मोदींना भेट दिली. तर नेमबाज मनू भाकरने पंतप्रधानांना पिस्तूल भेट म्हणून दिले. याशिवाय, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपली हॉकी स्टीक पंतप्रधानांना भेट म्हणून दिली. पदकविजेत्या खेळाडूशिवाय पंतप्रधान मोदींनी सरबजोत सिंग, मनू भाकर आणि श्रीजेश, स्वप्नील कुसाळे, बॉक्सर लोवलिना बोर्गोहेन, वेटलिफ्टर मीराबाई चानू या खेळाडूंशी चर्चा केली. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनशीही त्यांनी बराचवेळ गप्पा मारल्या. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया व पीटी उषा उपस्थित होते. परंतु, भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकणारा नीरज चोप्रा या सोहळ्यात सहभागी झाला नाही. नीरज दुखापतीवर डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जर्मनीत आहे तर सिंधू देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकली नाही.

विनेश ही देशाची शूर मुलगी

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटने जबरदस्त कामगिरी साकारली. पण अवघे 100 ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळे तिला ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, पॅरिसहून परतलेल्या खेळाडूंची मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पंतप्रधान विनेश फोगाटसाठी म्हणाले, विनेश ही देशाची शूर मुलगी आहे. तिने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे.

राष्ट्रपतींनी केले पदकविजेत्यांचे अभिनंदन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. यावेळी त्या म्हणाल्या, पॅरिस ऑलिम्पिकमधील तुमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करते. माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते आहात, तुमच्या कामगिरीचा सर्व देशवासियांना अभिमान आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी नेमबाज मनू भाकर व हॉकीपटू पीआर श्रीजेश यांनी आपली मते मांडली.

Advertisement
Tags :

.