गुंतवणुकीचे सुवर्णयुग
सोन्याच्या दरात यावर्षी सातत्याने व मोठी वाढ झाल्याने गुंतवणुकीचे सुवर्णयुग अवतरले असे अनेकांना साधकबाधक वाटते. केवळ एका वर्षात 50 ते 60 टक्के परतावा देणारी व कायमची विश्वासार्हता असणारी ही गुंतवणूक नेमकी कोणत्या कारणाने अशी वेगाने वाढत आहे. भविष्यकाळातही ही असाच परतावा देईल का? सध्या सोन्यांचे आणि चांदीचे दर वाढत असून त्यामध्ये गुंतवणूक करावी का? सध्या चांगले दर असल्याने ते विकून इतर मालमत्तेत गुंतवणूक करावी असे अनेक प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या मनात सुवर्णगुंता तयार करीत असतील. यासाठी ही सुवर्णनगरी केवळ तात्कालिक स्वरुपात न पाहता त्याबाबत जागतिक गुंतवणूक संदर्भ, भाववाढ, व्याजदर, भूराजकीय धोरणात्मक बदल, चीन व अमेरिकेचे धोरण अशा अनेक निकषांवर अभ्यासावी लागेल.
मुख्यत्वे सोन्याच्या खरेदीत केवळ अर्थकारण असत नाही तर भावनिक गुंतवणूक देखील असल्याने व्यक्तिगत अथवा कौटुंबिक पातळीवर सोने-चांदी फक्त खरेदीसाठीच प्रामुख्याने विचारात घेतले जात असते. त्यामुळे गुंतवणुकीचे वास्तव निकष वापरुन सोन्याचा कस तपासल्यास भविष्यकालीन गुंतवणूक दिशा स्पष्ट होईल. दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणाचा वापर केवळ आनंदासाठी न करता आपल्या गुंतवणुकीची (पोर्टफोलियोचे) आरोग्य तपासणी केल्यास पुढील दीपावलीपर्यंत ‘अर्थसंपन्नता’ वाढलेली असू शकेल. यासाठी हे गुंतवणुकीचे सुवर्णयुग समजून घेऊ.
सोने दरवाढ- सोन्याच्या दरात चालूवर्षी मोठी वाढ झाली असली तरी गेल्या 20 वर्षात 14 टक्के तर गेल्या 10 वर्षात 13 टक्के व गेल्या 5 वर्षात 13.5 टक्के परतावा दिला आहे. पण सोने सातत्याने दरवर्षी वाढतेच असे मात्र नाही. सोने 2010 ते 2012 या वर्षात 24 टक्के, 32 टक्के व 12 टक्के असे वाढले नंतर मात्र 2013 मध्ये 4.9 टक्के, 2014 मध्ये 8.2 व 2015 मध्ये 6.2 टक्के असे घटले. 2013 ते 16 ही वर्षे सोन्याचा परतावा उणे दर्शवतात. त्यानंतर मात्र 2016 मध्ये 11.5 टक्के, 2017 मध्ये 5.2 टक्के, 2018 मध्ये 7.5 टक्के तर 2010 मध्ये 24 टक्क्याने वाढले. 2020 मध्ये पुन्हा 13.6 टक्के, 2021 मध्ये 4.28 टक्के, 2022 मध्ये 5.74 टक्के तर 2023 मध्ये 9.84 टक्क्याने वाढले. सोन्याचा दर 2023 मध्ये 65330 (प्रति 10 ग्रॅम) होता तो 2024 मध्ये 64000 असा झाला. मात्र 2025 च्या दराने लाखाचा टप्पा ओलांडून तो 1,31,000 च्या पुढे गेला. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षात प्रथमच सोने 5.5 टक्के व चांदी 8.4 टक्क्यांने घटली! सोन्याच्या परताव्याचा शेअर बाजाराच्या परताव्याशी तुलना केली तर केवळ 1 टक्का परतावा यावर्षी शेअर बाजाराने दिला असला तरी उणे परतावा फक्त 2 वेळा 2015 (-5टक्के) 2011 (-25 टक्के) असा दिलेला दिसतो. जर आपण दीर्घकाळाचा विचार केला तर 1947 पासून सुवर्ण परतावा 9.6 टक्के दिसतो. सुवर्ण परतावा हा महागाई दराइतकाच दीर्घकाळात असल्याने यातील गुंतवणूक व जोखीम समजून घेणे आवश्यक ठरते. सोने गुंतवणूक सांभाळणे खर्चिक व चोरीची भीती असणारे, शुद्धतेचा संशय निर्माण करणारे व विक्रीच्यावेळी येणारी घट (दागिनेबाबत) ही अडचणीची किंवा नकारात्मक बाजू लक्षात घ्यावी लागते. मात्र या जोखीमा नव्या तंत्राने कमी करता येतात. ईटीएफ याचा उपयोग करता येतो.
दरवाढ का? - सोन्यातील दरवाढीचे उच्चांक आणि सोने 2 लाखाचाही टप्पा पार करणार, का पुन्हा 1 लाखाच्या आत येणार याचे उत्तर सोन्याच्या मागणी पुरवठ्यात व सोन्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व यामध्ये सापडते. सोने हे व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षणात्मक भत्ता (पा् Assाt) असल्याने जेव्हा अनिश्चितता, आर्थिक संकटाची शक्यता, महागाई वाढ, युद्ध, मंदी अशा प्रसंगी सोने हे तारणहार ठरते. व्यक्तिगत स्तरावर अपघात, आर्थिक संकट यातून बाहेर पडण्यासाठी सोने कर्ज हा एक मार्ग ठरतो. गेल्या 10 वर्षात घरगुती सुवर्णकर्ज 2014 मध्ये 1 लाख 30 हजार कोटी होते ते आता 13 लाख कोटी झाले आहे. यातून सोने हे आर्थिक संकटातील एक विश्वसनीय साधन ठरते! राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सुवर्णसाठा ठेवत असतात व त्यात वाढ करत असतात. याबाबत चीनचे सुवर्णधोरण सोन्याची प्रचंड मागणी वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे. चीनने आपला सुवर्णसाठा 500टन वरून 2300 टन असा वाढवला व आपल्या अर्थव्यवस्थेचा सुवर्ण पाया घट्ट केला. भारताकडे 800 टन तर अमेरिकेकडे 8000 टन सोने केंद्रीय बँकेकडे आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात सोने हे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने प्रत्येक राष्ट्राच्या गंगाजळीत सोने ठेवले जाते व प्रसंगी वाढवले जाते. अमेरिकेचे आक्रमक व्यापार धोरण, जकात दहशतवाद यातून जागतिक व्यापार मंदावत असताना अमेरिकेचे प्रचंड कर्ज हे 37 ट्रिलियन डॉलरचे असून त्याचाही परिणाम सुवर्ण किमतीवर होताना दिसतो. महत्त्वाचे म्हणजे सोन्याचे उत्पादन प्रतिवर्षी साधारण 3000 टन होते व त्याच्या उत्खननाचा, प्रक्रियेचा खर्च वाढत असल्याने सोने प्रति औंस 4000 डॉलरच्या पुढे गेले आहे.
भविष्यातील दर- सोने दरात नजिकच्या भविष्यकाळात घसरणीपेक्षा वाढीच्या शक्यता अधिक आहेत. सध्याचे जागतिक स्तरावर असणारे अनिश्चिततेचे, संघर्षाचे वातावरण, डॉलर कमकुवत होण्याची शक्यता असून गुंतवणुकीचा सुरक्षित स्वर्ग (पनह द घ्हनूसहू) सोनेच ठरते. तथापि सोने दरात अशी लक्षणीय वाढ होण्याऐवजी ती 8 ते 12 टक्के दरम्यान होणेची संभाव्यता अधिक राहते. सोने व्यवहारात होत असलेली सट्टेबाजी, साठेबाजी यातून अचानक दर घसरण्याचेही चित्र निर्माण होऊ शकते. परंतु सातत्याने दरघट ही संभावना रहात नाही. वैयक्तिक गुंतवणूक स्तरावर या दरपातळीस नव्या गुंतवणुकीस प्राधान्य न देणे अधिक योग्य ठरू शकते. सोने गुंतवणुकीस दरमहा योजनाबद्ध (एसआयपी) करणे व ही गुंतवणूक पेपरगोल्ड स्वरुपात म्हणजे इटीएफ अथवा सुवर्ण गुंतवणूक म्युचल फंड प्रत्यक्ष सोन्यापेक्षा योग्य ठरते. साधारण आपल्या गुंतवणुकीच्या 20 ते 25 टक्के किंवा किमान 10 टक्के सुवर्ण गुंतवणूक पर्याय संतुलित गुंतवणूक रचना तयार करू शकतो. मात्र त्यासाठी अधिकृत तज्ञांचा सल्ला घेणे हेच महत्त्वाचे ठरते.
गुंतवणूक सुरक्षितपेक्षा उत्पादक महत्त्वाची-
सोन्यातील गुंतवणूक ही भीती, असुरक्षितता यातून संरक्षण करणारी व्यवस्था म्हणून आवश्यक ठरते. अशी गुंतवणूक व्यक्तिगत व जागतिक पातळीवर वाढणे हा खरा भयनिदर्शक आहे. त्यामुळेच झोहोचे वेम्बु यांनी सोन्यातील दरवाढ व गुंतवणूक ही भयसूचना असल्याचे म्हटले आहे. सोने स्वत: मृत गुंतवणूक असून ती फक्त ‘साठा’ म्हणून उपयुक्त आहे. सुवर्ण आधार विश्वासार्हतेचा असून नवे डिजिटल तंत्र ही नवी ‘मत्ता’ तयार होत असून डॉलरचा पर्याय ब्रिक्समार्फत होण्याची गती वाढत आहे. ब्लॉक चेन तंत्र विश्वासार्ह, जलद व सुरक्षित व्यवहाराचे साधन उत्पादकता वाढवणारे आहे. गुंतवणूक उत्पादक कंपन्यात प्रामुख्याने शेअर्स स्वरुपात करणे हे चांगल्या परताव्यास आवश्यक ठरते. आपल्या गुंतवणुकीच्या 40 ते 60 टक्के ही अशी जोखीम असणारी परंतु उत्पादक गुंतवणूक हवी. सोन्याच्या हव्यासातून घडलेले ‘रामायण’ सुवर्णभरोसा चकवा देणारा असतो हे सोन्याने अनेकवेळा उणे परतावा देऊन सिद्ध केले आहे. खरी संपत्ती उत्पादक, गतिक्षम, सुरक्षित हवी. यापैकी सोने फक्त एक निकष पूर्ण करते. अशा एककल्ली गुंतवणुकीत सावधानता हवी. डिजिटल युग सुवर्णयुगाच्या अंताकडे नेत असल्याचे भाकीत वॉरेन बफे यांनी केले आहे ते दिशादर्शक वाटते.
प्रा. विजय ककडे