कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहा वर्षे आधीच ‘विकसित गोवा’ची लक्ष्यपूर्ती होणार

07:38 AM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गृहमंत्री  शहा यांचा विश्वास : 2451 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटने  माझे घर योजनेचा अनोख्या पद्धतीने शुभारंभ

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

भाजपच्या शक्तीशाली डबल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली गोवा राज्याने विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवल्यास वर्ष 2047 पर्यंत विकसित राज्य बनण्याचे जे लक्ष्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारने ठेवले आहे ते 2035 ते 2037 मध्येच गाठले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृह, सहकारमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. गोवा हे राज्य म्हणजे भारतमातेच्या भाळी लाल टिळा आहे, अशा शब्दात त्यांनी प्रशंसाही केली.

गोवा सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. ताळगाव येथील खचाखच भरलेल्या डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री विश्वजित राणे, दिगंबर कामत, माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, रोहन खंवटे, रमेश तवडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्याशिवाय अन्य मान्यवरांमध्ये उपसभापती ज्योशुआ डिसोझा, दिव्या राणे, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर तसेच भाजपचे पदाधिकारी, मुख्य सचिव, अन्य खाते प्रमुख उपस्थित होते.

व्यासपीठाची कल्पकता समयसूचक

या सोहळ्याचे व्यासपीठ अत्यंत कल्पकतेने कार्यक्रमाच्या उद्देशाला साजेसेच बनविण्यात आले होते. त्यात दोन्ही बाजूंनी दोन घरे व त्यांच्या समोर तुळशीवृंदावने बनविण्यात आली होती. श्री. शहा यांच्याहस्ते यातील एका तुळशीवृंदावनाला पाणी वाहून माझे घर योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर त्यांच्याहस्ते एकुण 2451 कोटी गुंतवणुकीच्या प्रशासन स्तंभ, जुन्ता हाऊस इमारत, सरकारी गॅरेज, नवीन सर्कीट हाऊस, युनिटी मॉल, टाऊन स्क्वेअर, छत्रपती शिवाजी महाराज किल्ला, हरवळे धबधब्याचे सौंदर्यीकरण यासारख्या 19 प्रकल्पांची आभासी पद्धतीने पायाभरणी करण्यात आली. त्याशिवाय बांधकामे पूर्ण झालेल्या अन्य विविध प्रकल्पांची उद्घाटनेही करण्यात आली.

यावेळी श्री. शहा यांच्याहस्ते राज्य सरकारने गोवा कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून निवड केलेल्या 215 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्याशिवाय माझे घर योजनेतील 11 निवडक मालकांना घराचा कायदेशीर हक्क मिळवून देणाऱ्या सनदा प्रदान करण्यात आल्या.

विकासाची घोडदौड प्रशंसनीय

पुढे बोलताना श्री. शहा यांनी, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोवा तसेच देशासाठी दिलेल्या योगदानासाठी अभिवादन केले. पर्रीकर यांनी आपल्या कल्पक आणि अनोख्या कार्यपद्धतीने गोव्याचे नाव देशभरात उज्ज्वल केले, असे ते म्हणाले. त्यांचा वारसा आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत समर्थपणे पुढे नेत असून त्यांची विकासाची घोडदौड खरोखरच प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले.

गत सुमारे 15 वर्षांपासून आपण गोव्यात येत आहे. त्या काळात विविध विकासकामे आणि योजना मार्गी लागल्या. विकासाची ही घोडदौड पाहता विकसित बनण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी गोव्याला 2047 पर्यंतची वाट पाहावी लागणार नाही. ते उद्दिष्ट, दर्जा वर्ष 2037 पर्यंतच गाठला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

‘माझे घर’ योजनेचे मुख्यमंत्री सावंत शिल्पकार

माझे घर ही योजना म्हणजे सावंत यांच्यातील नेतृत्वगुणांची क्षमता दर्शविणारी आहे. खरे तर गोवा मुक्त झाल्यापासून घरे नियमित करण्याची स्थानिकांची मागणी होती. परंतु सदर प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नव्हती. अशी सनद मिळविण्यासाठी विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत होत्या. डॉ. सावंत यांनी त्या सर्वांना  एकाच कायद्याच्या छताखाली आणून प्रक्रिया सुटसुटीत केली. त्यामुळे आता राज्यातील हजारो लोकांना हक्काचे घर मिळणे सहजसाध्य होणार आहे.  त्याशिवाय दुऊस्तीसाठी तर केवळ तीन दिवसांच्या आत मंजुरी देणे स्थानिक स्वराजसंस्थांना बंधनकारक ठरणार आहे, असे श्री. शहा यांनी सांगितले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या योजनेचे खरे शिल्पकार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना शहा यांनी 2014 मध्ये गोव्याचे दरडोई उत्पन्न 12073 ऊपये होते. केवळ दहा वर्षांच्या काळात हेच उत्पन्न 35700 वर पोहोचले आहे. अशावेळी विरोधकांच्या आरोपात कितपत तथ्य आहे याचा प्रत्येक गोमंतकीयांने विचार करावा, असे शहा यांनी सांगितले. जीएसटी कपातीमुळे केवळ गोव्याचाच नव्हे तर देशभरातील लोकांचा फायदा झालेला आहे. तब्बल 395 वस्तुंवरील एक तृतीयांश करकपात करून केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे, असेही शहा यांनी नमूद केले.

‘माझे घर’ ही योजना नव्हे, ती एक चळवळ

मुख्यमंत्री सावंत यांनी बोलताना, माझे घर ही केवळ एक योजना नसून ती एक चळवळ, मोहीम आहे, असे सांगितले. अल्वारा जमिनी, मोकासे, महसूल खात्याची जमीन, कोमुनिदाद जमिनीत घरे असलेल्या गोमंतकीयांना आता त्या घरांचे मालकी हक्क प्रदान करण्यात येतील. पुढील सहा महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल व प्रत्येकास खऱ्या अर्थाने त्याचे हक्काचे घर मिळाल्याचे समाधान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

श्री. शहा यांचे आगमन जरी सायंकाळी 6च्या दरम्यान झालेले असले तरी राज्यभरातील लोकांनी दुपारी 3 वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी येण्यास प्रारंभ केला होता. अशावेळी त्यांना जास्त काळ तिष्ठत ठेवणे योग्य नसल्याने चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सदानंद तानावडे, रमेश तवडकर, सुदिन ढवळीकर, बाबूश मोन्सेरात, दिगंबर कामत, विश्वजित राणे आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

मोदी, शहा, सावंत दूरदृष्टीचे नेते : नाईक

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात, मुक्तीपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आपण साक्षीदार असून केंद्रात नरेंद्र मोदी व अमित शहा आणि गोव्यात प्रमोद सावंत हे नेते म्हणजे सक्षम नेतृत्व, निर्णय क्षमता आणि सर्वसमावेशक दूरदृष्टी असलेली व्यक्तिमत्वे आहेत, असे प्रशंसोद्गार काढले.

हा निर्णय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल : ढवळीकर

ढवळीकर यांनी आपल्या भाषणात माझे घर च्या माध्यमातून लोकांना घरांचे हक्क मिळवून देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

विकसित गोवा बनविण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये क्षमता : राणे

विश्वजित राणे यांनी आपल्या भाषणात, विकसित गोव्याचे स्वप्न केवळ मुख्यमंत्री सावंतच पूर्ण करू शकतील, असे प्रशंसोद्गार काढले.

संकल्प आमोणकर यांनी स्वागत केले. प्रवीण गांवकर यांच्या पथकाने स्वागतगीत सादर केले. मुख्य सचिव डॉ. कंदवेलू यांनी आभार मानले.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article