तिळारी धरणाच्या गोवा कालव्याला मोठे भगदाड
गोव्यात येणारा पाणीपुरवठा बंद : अस्नोडा, पर्वरी प्रकल्पास फटका
पणजी : तिळारी धरणाच्या गोव्याकडे येणाऱ्या कालव्याला भगदाड पडून तो फुटल्यामुळे कालव्याचे पाणी बंद करण्यात आले असून त्याचा फटका अस्नोडा आणि पर्वरी पाणी प्रकल्पास बसला आहे. त्यामुळे बार्देश तालुक्यातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून मर्यादीत पाणी पुरवठा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (महाराष्ट्र) भटवाडी, कुडासे येथे हा गोव्याकडे पाणी वाहून नेणारा कालवा फुटला असून तेथील भाग जलमय होऊन शेती पाण्याखाली गेल्याचे समोर आले आहे. तिळारी धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार समजताच त्यांनी सदर कालव्यातून गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे.
अस्नोडा आणि पर्वरी हे दोन्ही पाणीप्रकल्प तिळारीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने बार्देश तालुक्याच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. दोन्ही प्रकल्पात कच्चे पाणी तिळारी धरणातून मिळते ते आता बंद झाल्याने कच्च्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अस्नोडा पाणी प्रकल्पास सध्या पार नदीच्या पाण्याची जोडणी देण्यात आली आहे. पर्वरी पाणी प्रकल्पाला जोडणी देण्याची सोय नसल्याने तो बंदच ठेवला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. हा फुटलेला कालवा कधी दुरूस्त होणार याचा सध्या तरी पत्ता नाही. त्यामुळे बार्देशमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून एक दिवसाआड पाणी देण्यात येईल, असे सांगण्यात आले.