जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रवास संकटांसोबत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली :
जागतिक अर्थव्यवस्था विविध संकटांशी टक्कर देत आहे. जागतिक महामारीनंतर जागतिक विकासाला फटका बसला आहे. मात्र सध्या यामध्ये काहीशी सुधारणा होत आहे मात्र त्याचा वेग मंदावला असून तो एकसारखा नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
अर्थमंत्रालय, कामगार मंत्रालय आणि वाणिज्य विभागातर्फे आयोजित मजबूत, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढ या विषयावरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. जी 20 च्या निमित्ताने भारताने नेतृत्व करत जागतिक लोकसंख्येच्या देशांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याबाबत योग्य ती ध्येयधोरणे आखून दिली आहेत. पण बहुतेक देशांनी याकडे लक्ष दिले नाही. भारताचे जी 20 अध्यक्षपद या महिन्याच्या अखेरीस संपणार असले तरी नवी दिल्ली घोषणेच्या धोरणात्मक मार्गदर्शनाची गती कायम राहिली पाहिजे.
मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी घोषणा केली की नवी दिल्लीच्या घोषणेनंतर प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 22 नोव्हेंबर रोजी जी 20 नेत्यांची आभासी बैठक आयोजित केली जाईल. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील ही शेवटची बैठक होणार असल्याची माहिती आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही आघाड्यांवर धोरणात्मक समन्वय राखणे महत्त्वाचे आहे.