ओवळीये गांगोबा मंदिर जिर्णोद्धारासाठी १,२१,१२१ रूपयाची देणगी
शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांचा दानशूरपणा
ओटवणे प्रतिनिधी
ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपयाचा धनादेश दिला. गांगोबा देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवात डॉ चंद्रकांत सावंत यांनी हा धनादेश स्थानिक व्यवस्थान कमिटी आणि देवस्थानचे मानकरी यांच्याकडे सुपूर्त केला.गांगोबा मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. मंदिराच्या सभामंडप, गाभारा आणि कळसाचे काम पूर्णत्वास येत असून मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी ओवळीयेवासीयांसह भाविक भक्तांचे सहकार्य लाभत आहे. डॉ चंद्रकांत सावंत यांनी या मंदिराच्या जर्णोद्धारासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे स्थानिक देवस्थान कमिटी आणि मानकरी यांनी आभार मानले आहे. यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष चंद्रकांत विश्राम सावंत, खजिनदार बाबुराव शिवराम सावंत, सचिव संतोष अनंत सावंत, न्हानू सीताराम सावंत, महादेव शंकर सावंत, मोहन महादेव सावंत, प्रकाश आत्माराम सावंत, सदानंद गोविंद सावंत, महेश धोंडी सावंत तसेच मानकरी, राजेश यशवंत गावडे आणि भाविक उपस्थित होते. डॉ चंद्रकांत सावंत यांनी चार वर्षांपूर्वी आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या फणसवडे गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज स्वतः भरून या महिलांना त्यांनी कर्ज मुक्त केले. तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक अशा ७९ शाळांमधील १३१ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत चार लाख १० हजार कोटी रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या त्या शाळेतील एकूण १३१ मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः पदरमोड करून केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याची नोंद विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली असून विविध सेवा व संस्था त्यांनी दखल घेत त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार प्रदान केले आहेत.