‘नरका’चे द्वार बंद होणार...
‘नरक’ हा शब्द कानावर पडला, तरी अंगावर काटा उभा रहातो, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. स्वर्ग, नरक असे काही अस्तित्वातच नसते, असे विज्ञान म्हणत असले, तरी अनेकांचा त्यांच्या अस्तित्वावर विश्वास असतो. या पृध्वीवर असे एक स्थान आहे, ज्याला नरकाचे प्रवेशद्वार मानले गेले आहे. हे स्थान मध्य आशियातील तुर्कमेनिस्थान या देशात असून ते एक नैसर्गिक ‘अग्निकुंड’ (व्रेटर) आहे. 39 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल असे हे अग्निकुंड गेल्या अनेक दशकांपासून धगधगत आहे. त्याच्या ज्वाळा कित्येक किलोमीटर दूरवरुनही दृष्टीस पडतात. पुराणकथांमध्ये नरकाचे जे वर्णन केलेले आहे, तशाच प्रकारे हे स्थान असल्याने त्याला ‘नरका’चा दरवाजा असे म्हणण्याची प्रथा रुढ झाली आहे.
हा दरवाजा 1971 मध्ये प्रथम उघडला. म्हणजेच हे अग्निविवर निर्माण झाले. पृथ्वीच्या पोटातून अचानक आगीचा ज्वाळा बाहेर पडू लागल्या. तेव्हापासून आजवर ही स्थिती आहे. हे विवर खरे तर माणसाच्याच एका चुकीमुळे निर्माण झाले होते. नैसर्गिक वायू बाहेर काढण्यासाठी खडकांमध्ये भोके करताना चूक झाली आणि हे विवर निर्माण झाले. आजवर या विवरातून ज्वलनशील नैसर्गिक वायू बाहेर पडत आहे आणि हवेशी संपर्क येताच तो जळू लागल्याने सातत्याने या विवरातून ज्वाळा बाहेर पडत आहे. हे दृष्य बघण्यासाठी प्रतिवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशांमधून येथे येत असतात. अशा प्रकारे हा नरकाचा दरवाजा एक पर्यटनस्थळ बनला असून त्याची जगभर विविध प्रकारे चर्चा होत आहे.
तथापि, हे नरकाचे प्रवेशद्वार लवकरच बंद होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण या विवरातून बाहेर पडणाऱ्या आगीचा स्रोत असणारा नैसर्गिक ज्वलनशील वायू आता कमी होऊ लागला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या विवरातून बाहेर पडणाऱ्या ज्वाळांची उंची आणि धग कमी कमी होऊ लागली आहे. संशोधकांच्या अनुमानानुसार आणखी एक ते दोन दशकांमध्ये हे नरकद्वार बंद होणार आहे. अनेक वर्षांपासून हे विवर बंद करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण तो यशस्वी होत नव्हता. आता ‘देवा’नेच हे द्वार बंद करण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये हा अद्भूत अग्नी शांत होणार असून पृथ्वीवरचे हे नरकद्वार कायमचे बंद होण्याची शक्यता आहे. ते बंद झाले, तरी ज्यांनी ते पाहिले आहे, त्यांच्या स्मरणातून ते जाणार नाही, असे मानले जाते.