For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे

06:04 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, अर्जुना जे आत्म्याचा अनुभव घेतात ते समोर दिसणाऱ्या जगाचे अस्तित्व विसरून जातात. म्हणून आत्म्याला ज्यांनी जाणले आहे ते त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. सर्वांच्या देहामध्ये असणारा हा आत्मा सर्वदा अमर आहे म्हणून तू कोणत्याही प्राणिमात्राच्या देहनाशाबद्दल कधीही शोक करू नकोस. हे आत्मरूपी चैतन्य अमर असून विश्वामध्ये समप्रमाणात भरलेले असल्याने त्याने सर्व विश्व व्यापलेले आहे.

पुढील श्लोकातून भगवंत त्याला त्याच्या कर्तव्याची म्हणजे स्वधर्माची आठवण करून देतात. ते म्हणाले, ह्या युद्धापासून तू परावृत्त होणे योग्य नाही कारण क्षत्रियाला धर्मयुद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही. ह्या अर्थाचा

Advertisement

स्वधर्म तो हि पाहूनि न योग्य डगणे तुज । धर्म-युद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले ।। 31 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, स्वधर्माचा विसर पडल्याबद्दल भगवंतानी अर्जुनाला खडसावण्यास सुरवात केली. ते म्हणाले, अर्जुना ह्या भवसागरातून तारून नेणारा स्वधर्म तू विसरला आहेस. या कौरवांचे वाटेल ते झाले किंवा युद्ध करताना तुझ्यावरच काही संकट आले तरी यापैकी कोणत्याही कारणाने स्वधर्म त्यागणे योग्य नाही. तूझ्या मनात निर्माण झालेल्या दयेच्या भावनेने तू तरशील असे तुला वाटते काय? अर्जुना ! तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी स्वधर्म विसरणे अयोग्य आहे. गायीचे दूध हे पवित्रच असते पण वैद्याने सांगितलेले पथ्य मोडून ते जर नवज्वरात दिले, तर ते विषासमान मारक होते, त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते आचरण केले, तर हिताचा नाश होतो. म्हणून तू आता सावध हो. स्वधर्माचे आचरण केले असता कसलाही दोष लागत नाही. येथे पाप-पुण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या प्रमाणे सरळ रस्त्याने चालले असता कधीही अपाय होत नाही किंवा रात्री दिव्याच्या उजेडात चालले असता ठेच लागत नाही त्याप्रमाणे हे पार्था स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात. म्हणून क्षत्रियांना तरून जाण्यासाठी युद्धवाचून इतर काहीही उपयोगाचे नाही. मनात कपट न धरता, समोरासमोर उभे राहून शौर्याने युद्ध करावे, आता तर प्रत्यक्ष युद्धाची वेळ आली आहे. एव्हढे सांगून भगवंत युद्ध करणे कसे योग्य आहे हे पटवण्यासाठी युद्धाची महती सांगत आहेत. ते म्हणतात, सहजपणे प्राप्त झालेले हे युद्ध म्हणजे आपोआप उघडलेले स्वर्गाचे द्वार होय. असे हे युद्ध भाग्यशाली क्षत्रियांच्याच वाट्याला येते.

प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे । क्षत्रियास महा-भाग्ये लाभते युद्ध हे असे ।। 32 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, अर्जुना ! आताचे हे युद्ध म्हणजे तूमचे पूर्व जन्मीचं भाग्य होय अथवा धर्माचा सर्व ठेवाच तुमच्यापुढे प्रकटलेला आहे. अरे ह्या युद्धाच्या निमित्ताने मूर्तिमंत स्वर्गच अवतरला आहे असे समज किंवा तुझ्या शौर्यगुणांच्या लौकिकावर आसक्त होवून कीर्तिरूपी स्त्राr उत्कट इच्छेने तुला वरण्यास आली आहे असेही म्हणता येईल.

पुष्कळ पुण्य करावे, तेंव्हा क्षत्रियाच्या जीवनात अशी सुसंधी चालून येते. जसे सहज रस्त्याने जाताना ठेच लागावी आणि कशाला ठेचकाळलो हे पहायला जावे तो मनातील इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी सापडावा किंवा जांभई देण्यासाठी तोंड उघडावे आणि अचानक अमृत येऊन तोंडात पडावे, त्याप्रमाणे हा धर्मयुद्धाचा प्रसंग अनायासे वाट्याला आला आहे, असे समज.

क्रमश:

Advertisement
Tags :

.